कुणी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेसकोर्स सांगा! एनआरसीवरून अरुंधती रॉय यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 07:50 PM2019-12-25T19:50:19+5:302019-12-25T19:59:04+5:30
आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेला सीएए कायदा आणि प्रस्तावित एनआरसीच्या मुद्द्यावरून सामाजिका कार्यकर्त्या आणि लेखिका अरुंधती रॉय यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता द्या, असा सल्ला अरुंधती रॉय यांवी दिला आहे.
आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अरुंधती रॉय उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत अभिनेते जिशान अय्यूब आणि अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमारसुद्धा उपस्थित होते.
यावेळी अरुंधती रॉय म्हणाल्या की, ''देशातील डिटेंशन कॅम्पबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा याबाबत देशासमोर चुकीची माहिती मांडली आहे. जेव्हा महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी सरकारविरोधात आवाज उठवतात तेव्हा त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून हिणवले जाते.''
''एनपीआरसुद्धा एनआरसीचाच भाग आहे. त्यामुळे जेव्हा एनपीआरसाठी सरकारी कर्मचारी माहिती घेण्यासाठी तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचे नाव रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला असल्याचे सांगा. तसेच घराचा पत्ता देण्याऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता लिहून द्या,'' सल्लाही अरुंधती रॉय यांनी दिला.
''त्तर भारतात जेव्हा जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते. तेव्हा तेथील माता भगिनी आपल्या मुलांच्या आधी आपली कागदपत्रे वाचवतात. कारण त्यांना माहिती आहे की जर कागदपत्रे वाहून गेली तर त्यांचे येथे राहणेसुद्धा कठीण होऊन जाईल,''असा टोलाही अरुंधती रॉय यांनी लगावला.