'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:47 AM2020-02-20T10:47:37+5:302020-02-20T10:47:42+5:30
आपल्याला जीनांच्या स्वप्नासाठी काम करायचे की, गांधीजींच्या ? असा सवाल योगींनी उपस्थित केला. तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं, असही योगींनी म्हटले.
नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या लोकांविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर तो जिवंत कसा राहिला, असं योगी म्हणाले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागरिकता संशोधन कायद्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाले. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या हिंसक आंदोलनात 22 लोकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले होते. यावर योगींनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले होते.
आंदोनात ठार झालेल्यापैकी कोणीही पोलिसांच्या गोळीने मरण पावले नाही. मृत सर्वजण हिंसा घडविणाऱ्यांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत. जर कोणी लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरत असले तर तो मरतो किंवा पोलीस कर्मचारी मरतो, असं योगींनी सांगितले होते.
दरम्यान मुख्यमंत्री योगींनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ लखनौ, कानपूर आणि प्रायगराज येथे आंदोलन करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी आजादीचे नारे लावले जात आहेत. काय आहे आजादी, आपल्याला जीनांच्या स्वप्नासाठी काम करायचे की, गांधीजींच्या ? असा सवाल योगींनी उपस्थित केला. तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं, असही योगींनी म्हटले.