CAA-NRC: 'तुमचा अधिकार हिरावून घेणाऱ्यांना माझ्या मृतदेहावरून जावे लागेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:00 PM2020-01-07T16:00:38+5:302020-01-07T16:02:25+5:30
'आम्ही कोणाच्या दयेवर जगत नाही आहोत'
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नागरिकत्व सुधारणा कायदा (सीसीए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दक्षिण 24 परगनामध्ये आयोजित एका रॅलीत ममता बॅनर्जी यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी सीसीए, एनपीआर आणि एनआरसीबद्दल कोणतीही माहिती मागितली तर देऊ नका. जर कोण तुमचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना माझ्या मृतदेहावरून जावे लागेल, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी सीसीए, एनपीआर आणि एनआरसीचा विरोध केला.
याचबरोबर, आम्ही कोणाच्या दयेवर जगत नाही आहोत. आम्ही आमच्या लोकांचे अधिकार काढू देणार नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सीसीए, एनपीआर आणि एनआरसी लागू करणार नाही, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या, त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
पुरूलिया येथे (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
याशिवाय, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.
(अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!)
(ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदावरून हटवा; सर्वोच्च न्यायालयात याचिका)
(नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल)
(ममतांना धोबीपछाड देण्यासाठी अमित शाह शिकतायेत बंगाली भाषा)