बाळासाहेब असते तर..
By admin | Published: September 30, 2014 02:05 AM2014-09-30T02:05:51+5:302014-09-30T02:05:51+5:30
राजकारणात ‘जर तर’ला कवडीची किंमत नसते. जे आज दिसतंय, जे घडतंय तेच वास्तव; बाकी बकवास! महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आजच्या राजकीय कालखंडात असते तर त्यांनी काय केले असते?
Next
>राजकारणात ‘जर तर’ला कवडीची किंमत नसते. जे आज दिसतंय, जे घडतंय तेच वास्तव; बाकी बकवास! महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आजच्या राजकीय कालखंडात असते तर त्यांनी काय केले असते? या कालखंडात क्रांतिसिंह नाना पाटील यांची भूमिका काय असली असती? अथवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असते तर.. अशा विषयांचे वेिषण आणि तशा प्रश्नांच्या उत्तरांची मांडणी केवळ वैचारिक-तार्किक आधारावर केली जाऊ शकते; पण त्या मांडणीला वर्तमानात फारसा वास्तववादी अर्थ नसतो. पण आज ‘जर तर’चा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार शुभारंभानिमित्ताने धडाडलेल्या तोफेमुळे उद्धव ठाकरे यांनी अनंत गितेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर पाणी सोडायला लावले. ठाकरे परिवार राजकारणात भलेही दुभंगलेला असेल; पण त्यांच्या लेखी मात्र ‘बाळासाहेब असते तर..’ या मुद्याला तहहयात महत्त्व आहे. कारण, व्यक्तिमत्त्व, सामाजिक दृष्टिकोन, मानसिक जडणघडण आणि संस्कार या प्रत्येक घटकावर या कुटुंबावर ‘ठाकरे शैली’चा नैसर्गिक आणि ठसठशीत प्रभाव राहिलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी बिंबविलेल्या प्रत्येक संस्काराची साक्ष देणारी कृती ठाकरेंच्या प्रत्येक पिढीकडून होताना महाराष्ट्राला दिसली. वक्तृत्वातील ठाकरे शैलीबद्दल बोलायचे झाले तर, प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना ‘गर्दीची भाषा’ बोलण्याचा कानमंत्र दिला होता. तो मंत्र बाळासाहेबांनी आयुष्यभर जतन केला आणि उभ्या महाराष्ट्राने बाळासाहेबांची भाषणो डोक्यावर घेतली. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती असो वा बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्नांसारखे ज्वलंत आणि जिव्हाळ्याचे सामाजिक विषयही काळाने त्या वेळी त्यांना दिले. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व ‘ठाकरे शैली’ने ठासून भरलेले आहे. पण त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वाला साथ देणारे विषय आणि परिस्थिती आहे का? मनसेच्या आजच्या वाटचालीतील अडथळे नेमक्या याच प्रश्नाच्या उत्तरात दडले आहे. राज यांच्या तोफेचा परिणाम सेना पक्षप्रमुख आणि अनंत गितेंच्या मंत्रिपदावर जरूर झाला; पण महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे काय? राज नव्या पिढीचे ‘टेक्नो सॅव्ही’, सामाजिक मानसशास्त्रचा अभ्यास व महत्त्व जाणणारे आणि कोणत्याही कृतीच्या ‘टायमिंग’वर जबरदस्त प्रभुत्व असलेले पुढारी मानले जातात. पण लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या कालावधीत त्यांच्याकडून पडलेल्या प्रत्येक पावलातून त्यांच्यात गुणवैशिष्टय़ांचा प्रभाव गायब झाल्याचे महाराष्ट्राने अनुभवले. अलीकडच्या काळात तर ‘टायमिंग’च्या बाबतीत ते दुर्दैवीच ठरले. बहुचर्चित ‘ब्लू प्रिंट’ महाराष्ट्रापुढे ठेवण्याचा दिवसच उदाहरणादाखल घ्या- अनेक वृत्तवाहिन्यांवरुन तो कार्यक्रम ‘लाईव्ह’ दाखविला जात होता आणि त्याच वेळी युती व आघाडीच्या महाफुटीचा मुहूर्त निघाला! सर्वाचे लक्ष ‘ब्लू प्रिंट’वरुन महाफुटीकडे कधी वळले हेही कळले नाही. मोदीसमर्थन ते कालचा प्रचार शुभारंभ या वाटचालीत राज ठाकरेंचे चुकले कुठे? या प्रश्नांचे रोखठोक उत्तर स्वत: राज यांनीच शोधण्याची वेळ आली आहे. मतांच्या राजकारणात उन्नीस-बीस होत राहते. पण ज्यांच्याकडे ‘लंबी रेस के घोडे’ म्हणून तमाम महाराष्ट्र आशेने आणि आदराने पाहतो, त्या नेत्यांनी स्वत:शी संवाद वाढवायला नको का? ‘जर तर’च्या महाजालात गुंतण्यापेक्षा त्या वास्तवाशी पक्की मैत्री जडविणोच राज ठाकरेंच्या वाटचालीस फलदायी ठरेल..
- राजा माने