भाजपची सत्ता आल्यास बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ
By admin | Published: July 6, 2014 11:56 AM2014-07-06T11:56:36+5:302014-07-06T11:58:45+5:30
हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान भाजप नेते ओमप्रकाश धनखड यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन टीम
गुडगाव, दि. ६ - केंद्रात सत्ता आल्यावर भाजप नेत्यांच्या जिभेवरचा ताबा सुटू लागला असून भाजपचे गुडगाव येथील नेते ओमप्रकाश धनखड यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान धनखड यांनी केले आहे.
भाजपच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असून मोदींच्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कामात धनखड यांच्याकडे मोलाची जबाबदारी देण्यात आली होती. धनखड यांनी हरियाणा येथे एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणात स्त्री - पुरुष यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण अविवाहीत राहतात. यावर तोडगा सुचवताना धनखड म्हणाले, हरियाणात भाजपची सत्ता आल्यास हरियाणातील अविवाहित तरुणांचे बिहारमधील तरुणींशी लग्न लावून दिले जातील. त्यामुळे हरियाणातील एकही तरुण अविवाहित राहणार नाही.
धनखड यांच्या विधानावर अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला आहे. धनखड यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु असा इशारा संघटनांनी दिला आहे. भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनीदेखील वादग्रस्त विधान करुन पक्षाची कोंडी केली होती. मुंबईत ५ रुपयांत जेवण मिळू शकते असे विधान शेलार यांनी केले होते.