''भाजपा कधी वाजपेयी-अडवाणींची नव्हती; तर मोदी-शहांची कशी होईल''
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:52 PM2019-05-10T22:52:24+5:302019-05-10T22:54:46+5:30
भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा व्यक्ती केंद्रीत पक्ष असल्याचे आरोप फेटाळले आहेत.
नवी दिल्ली : भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा व्यक्ती केंद्रीत पक्ष असल्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी भाजपा कधीही व्यक्ती केंद्रीत पक्ष नव्हता तर तो विचारधारेवर आधारित पक्ष होता असे म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपा हा केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचा कधी बनला नाही, ना ही केवळ अडवाणींचा बनला. यामुळे हा पक्ष कधीही केवळ मोदी-शहा यांचा बनू शकत नाही. हा पक्ष विचारधारेवर आधारित आहे. यामुळे व्यक्तीकेंद्रीत पक्ष आहे हे म्हणणे चुकीचे असल्याचे गडकरी म्हणाले. मात्र, भाजपा आणि मोदी एकमेकांना पुरक असल्याचे त्यांनी पुढे जोडले आहे.
1976 मध्ये काँग्रेसमध्ये 'इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा' अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे भाजपा हीच मोदी आणि मोदी म्हणजेच भाजपा, अशी बनली आहे का या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
एखादा ताकदवर पक्षही कमजोर नेत्याच्या नेतृत्वात जिंकू शकत नाही. भाजपामध्ये कोणत्याही कुटुंबाचे राज्य चालू शकत नाही. सरकारमध्ये सर्व निर्णय संसदीय मंडळ घेते. तसेच नेता मजबूत असेल आणि पक्ष कमजोर असेल तरीही तो पक्ष जिंकू शकत नसल्याचे गडकरी म्हणाले. परंतू, लोकप्रिय नेत्याला पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपा विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे, असे सांगताना गडकरी यांनी राष्ट्रवादाची ढाल केल्याचा आरोप फेटाळून लावला. मात्र, राष्ट्रवाद हा भाजपासाठी मुद्दा नसून आत्मा असल्याचेही ते म्हणाले. तसेच भाजपाला बहुमत मिळणार नसल्याच्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले. भाजपा 2014 पेक्षाही जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.