डोकलाममध्ये चीनने उत्तरेकडून दक्षिणेकडे मोर्चा वळवल्यास भारतीय लष्कराबरोबर संघर्ष अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 03:47 PM2018-01-18T15:47:12+5:302018-01-18T15:55:57+5:30
उत्तर डोकलाममध्ये चीनने उभारलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे आणि चिनी सैनिकांची उपस्थिती यावर भारतीय लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे.
नवी दिल्ली - उत्तर डोकलाममध्ये चीनने उभारलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे आणि चिनी सैनिकांची उपस्थिती यावर भारतीय लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणांमुळे डोकलाममध्ये पुन्हा एकदा भारत-चीन संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आधीच तसा इशारा दिला आहे. हिवाळा संपल्यानंतर डोकलाममधल्या वादग्रस्त प्रदेशात चिनी सैनिकांची संख्या वाढू शकते असा भारतीय सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे.
चीन पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल. भूतान डोकलाममधील ज्या भागावर आपला दावा सांगत आहे तिथेच चीनने लष्करी साम्राज्य उभे केले आहे. सॅटलाईट फोटोंमधून चीनच्या या लष्करी तळाचा खुलासा झाला आहे. डोकलाम पठाराच्या भागात चीनने विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हेलिपॅड उभारले आहेत. वादग्रस्त भागात पूर्व आणि पश्चिमेला अनेक लष्करी तळ उभे केले आहेत.
चीनने लष्करी तयारी पूर्ण केली असली तरी डोकलाममधल्या मोक्याच्या जागेवर भारतीय सैन्य तैनात आहे. आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत तसेच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असे भारतीय अधिका-यांनी सांगितले. चीनने उत्तरेकडून दक्षिणेकडे मोर्चावळवला आणि रस्ता बांधणीचे काम सुरु केले तर भारतीय सैन्याबरोबर त्यांचा संघर्ष अटळ आहे. सिक्कीमच्या डोका ला भागात भारताची पोस्ट आहे. चीनच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर ही पोस्ट आहे. युद्धाच्या प्रसंगात भारताची ही पोस्ट सहज चीनच्या टप्प्यात येईल.