उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास भाजपचा विजय निश्चित - अमित शाह
By admin | Published: September 7, 2014 11:48 AM2014-09-07T11:48:54+5:302014-09-07T11:48:54+5:30
उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास पुढील निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे वादग्रस्त विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास पुढील निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे वादग्रस्त विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या एकतर्फी भूमिकेमुळे राज्यातील जातीय तणाव वाढत असल्याचा आरोपही शाह यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमित शाह यांनी जातीय दंगलींविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. शाह म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होत आहे. मात्र त्या राज्यांमध्ये कोणताही जातीय तणाव नसून मग फक्त उत्तर प्रदेशमध्येच जातीय तणाव का निर्माण होत आहे ? हा तणाव कायम राहिल्यास उत्तरप्रदेशमध्ये भाजपचीच सत्ता येणार हे निश्चित आहे.
सोनिया गांधींनी भाजपची सत्ता येताच ६०० ठिकाणी जातीय दंगली झाल्याचा आरोप केला होता. शाह यांनी हा आरोपही फेटाळून लावला आहे. पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला अपयश आले असले तरी चार राज्यांमधील विधानसभांमध्ये भाजपलाच यश मिळेल असा दावाही त्यांनी केला.