दलितांना हत्यारे दिली असती तर देशावरील आक्रमण रोखता आलं असत - आरएसएस
By Admin | Published: April 13, 2016 09:46 AM2016-04-13T09:46:39+5:302016-04-13T09:47:45+5:30
भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा आरएसएसने केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १३ - 'भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले', असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केला आहे. आरएसएसने मुखपत्र ऑर्गनायझर मधून हा दावा केला आहे. 'जर अस्पृश्यांना हत्यारांपासून वंचित ठेवलं नसत तर देशावर परकीय शक्तीने राज्य केलं नसत', असं आंबेडकरांनी म्हंटल्याच आरएसएसने सांगितलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आंबेडकरांबद्दलची आपली आस्था सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांच अतिक्रमण रोखण्यासाठी आंबेडकरांचा काय दृष्टीकोन होता हे सांगण्याचा प्रयत्न आरएसएसने केला आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने आरएसएसने आंबेडकरांच्या लढ्यापासून ते योगदानापर्यंतची माहिती मुखपत्रात छापली आहे.
आरएसएसने आंबेडकरांच्या आयुष्याची माहिती दोन भागांत विभागली आहे. पहिल्या भागात आंबेडकर समाज आणि देशासाठी कसे जगले याबद्दल सांगण्यात आलं आहे. तर दुस-या भागात देशाचा विकास, सुरक्षा, एकता याबद्दलचे त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत.
आरएसएसने डावे पक्ष आणि काही मुस्लिम संघटनांवर टीका करत आंबेडकरांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे हिंदूंना बळकट करण्यासाठी तसंच दलितांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करु नये यासाठी आरएसएस हा प्रयत्न करत असल्याचं मत काही तज्ञांनी दिलं आहे.