दिरंगाईने निर्णय घेतले असते, तर देश संकटात सापडला असता -गौतम अदानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:20 AM2020-06-05T06:20:01+5:302020-06-05T06:20:36+5:30
कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतले नसते, तर देश फार मोठ्या संकटात सापडला असता, असे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या निर्णयाचे गौतम अदानी यांनी समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील मंडळींपैकी एक आहेत.
अदानी म्हणाले की, सर्वात मोठा उत्पादक तसेच सेवा पुरविणारा देश बनविण्यासाठी चालून आलेली योग्य संधी केंद्र सरकारने साधली. कोणत्याही संकल्पना या शंभर (पान ७ वर)टक्के बरोबर किंवा चूक नसतात. कोरोना साथीसारख्या अकस्मात उद्भवलेल्या संकटकाळात हाती उपलब्ध असलेल्या योग्य माहितीच्या आधारे कोणत्याही सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित असते, तसेच सतत मिळत राहणाऱ्या नव्या माहितीचे विश्लेषण करून आपल्या धोरणातही त्या सरकारने बदल केले पाहिजेत. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार व प्रशासनाने अशा पद्धतीनेच काम केले असून, ते अभिनंदनास पात्र आहेत.
अदानी उद्योगसमूहाच्या वार्षिक अहवालात चेअरमन या नात्याने गौतम अदानी यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आपल्यापेक्षा अधिक संपन्न असलेल्या देशांची कोरोनाशी लढताना दमछाक झाली आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यास केंद्र सरकारने वेळ दवडला असता, तर आपला देश मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता होती. त्याचा केवळ भारतावरच नव्हे, तर जगावरही परिणाम झाला असता. कोरोनाच्या साथीचा उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. मोठी जीवितहानी झाली आहे. असंख्य लोक बेकार झाले आहेत. स्थलांतरित मजुरांचे हाल अवघ्या देशाने पाहिले; पण केंद्र सरकारने योग्य वेळी हालचाली केल्या नसत्या, तर यापेक्षाही भयंकर गोष्टींना देशाला सामोरे जावे लागले असते.
सर्वांनीच बजावली उत्तम कामगिरी
उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करताना राजकीय नेते, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, लष्कर, फेरीवाले, नागरिकांनी आपापल्या परीने योग्य कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आपण कोरोनाशी उत्तम प्रकारे लढा देत आहोत. जनधन योजना, आधार, मोबाईल लिंकिंग या गोष्टींद्वारे केंद्र सरकारच्या योजनांचे जनतेला थेट फायदे मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.