शंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:40 AM2018-04-27T00:40:45+5:302018-04-27T00:40:45+5:30
सुप्रीम कोर्ट; कथुआ बलात्कार पीडितेच्या वडिलांनी घेतली धाव
नवी दिल्ली : देशभरात गाजणाऱ्या कथुआ बलात्कार खटल्याचे कामकाज स्थानिक न्यायालयात निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली तरी हा खटला दुसºया ठिकाणी वर्ग करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे. हा खटला जम्मू-काश्मीर राज्याच्या बाहेर विशेषत: चंदीगड येथे वर्ग केला जावा, अशी बलात्कारित मुलीच्या वडिलांनी केली असून, तिला कथुआ प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आरोपींच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, केवळ आरोपीच नव्हे तर बलात्कारित मुलगी, तिचे कुटुंबीय यांच्या दृष्टीनेही हा खटला कथुआ येथील न्यायालयात निष्पक्षपणे चालविला जाणे आवश्यक आहे. या दोन्ही पक्षांना व त्यांच्या वकिलांना योग्य संरक्षण पुरविण्यात यावे.
या खटल्याच्या कामकाजात वकिलांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे याचिकादाराने म्हटले आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, वकिलांकडून असे वर्तन झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीर क्राइम ब्रँचकडून काढून घेऊन तो सीबीआयकडे सोपविला जावा तसेच बलात्कारित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी करून घ्यावे अशी विनंती मुख्य आरोपी सांझीराम व विशाल जंगरोटा यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
बालिकेवर बलात्कार
गुवाहाटी : येथील एका मजुराला पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पॉस्को) त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. मुलगी घराबाहेर खेळत असताना शब्बीरने तिला आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन बलात्कार केला.
वातावरण कलुषित
कथुआतील बलात्कारित मुलीच्या वडिलांच्या वतीने अॅड. इंदिरा जयसिंग यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले होते की, कथुआमध्ये या प्रकरणावरुन वातावरण कलुषित झाले आहे. बलात्कारितेच्या वडिलांच्या वकिलावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे कथुआतील न्यायालयात या खटल्याचे कामकाज निष्पक्षपणे होण्याची शक्यता नाही. चंदीगढ हे जम्मू-काश्मीरला तुलनेने जवळ असल्याने तिथे हा खटला वर्ग करण्यात यावा.