...तर राम मंदिराचा विषयही भाजपाला तारू शकत नाही- सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:15 PM2019-12-03T16:15:20+5:302019-12-03T16:15:39+5:30
अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपा खासदारानं पक्षालाचा इशारा देत सांगितलं की, देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे.
मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भाजपाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते.
परंतु पुढील काही दिवसांत चांगली धोरणं येताना दिसत नाहीत. मला असं वाटतं हे कठीण असलं तरी अशक्य नाही.
दिल्ली आणि झारखंडमध्येही निवडणुका जिंकून आपण परिस्थिती बदलू शकतो. त्यासाठी दिल्लीत चांगला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा लागेल. जर आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवल्यास भाजपाचा विजय नक्कीच होईल, असा विश्वासही सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे.