दोषी आढळल्यास मेजर गोगोई यांच्यावर कारवाई केली जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:49 AM2018-05-26T00:49:29+5:302018-05-26T00:49:29+5:30
लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत; मुलीच्या घरी गोगोई रात्री जात असल्याची तक्रार
श्रीनगर : तरुणीला हॉटेलात प्रवेश न दिल्याने तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारे मेजर लीतुल गोगोई यांची लष्कराने चौकशी सुरू केली असून, त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे लष्करप्रमुख जनरल बिपिनकुमार रावत यांनी शुक्रवारी पेहलगाम येथे सांगितले.
पोलिसांनी मेजर गोगोई यांना व त्या तरुणीला लगेचच क्लीन चीट दिली असली तरी गांगोई यांचा व तिचा काय व कधीपासून संबंध आहे, ती हॉटेलात त्यांच्यासमवेत का आली होती, तिला प्रवेश न दिल्याने मेजर गोगोई यांनी वादावादी करण्याचे काय कारण होते, या साºया बाबींची चौकशी लष्करामार्फत केली जाणार आहे. गोगोई यांनी हॉटेलची सारी बिले क्रेडिट कार्डने देऊ , असे कळवले होते.
तरुणी आता घरी नाही
ती तरुणी आता बडगाममधील स्वत:च्या घरी नसून, तिला तिच्या कुटुंबीयांनी अन्यत्र पाठवले आहे. त्यामुळे संशयाचे धुके वाढले आहे. ती महिला बचत गटाचे काम करायची, असे सांगण्यात येते.
आईची तक्रार
त्या तरुणीच्या आईने गोगोर्इंवर गंभीर आरोप केले. ते दोनदा रात्री आमच्या घरी आले होते. गोगोई यांच्यासोबत हॉटेलमध्ये असलेला समीर अहमद हाही घरी यायचा', असे तरुणीच्या आईने सांगितले. मेजर गोगोई पहिल्यांदा घरी आले, त्यावेळी घाबरून आई बेशुद्धच पडली होती. सदर घटना घडली, तेव्हा माझी मुलगी बँकेत जाते, असे सांगून सकाळी घरातून निघाली. संध्याकाळनंतरही ती घरी परतली नाही, तेव्हा आम्ही पोलिसांना कळवले. तेव्हा मुलीचा ठावठिकाणा कळला. गोगोई यांचे रात्री घरी येणे मला खटकत असे. पण ते बोलून दाखवायलाही भीती वाटायची.