...तर भविष्यात 500 रुपयांची मदत आणखी वाढू शकते; जेटलींचे अमेरिकेतून सुतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:14 PM2019-02-03T19:14:52+5:302019-02-03T19:15:38+5:30
1 फेब्रुवारीला हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जेटलीच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला.
न्युयॉर्क : कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अमेरिकेमध्ये असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान शेतकरी मदत योजनेवर टीका होत असल्याच्या पार्श्वभुमीवर भविष्यात ही मदत आणी वाढू शकते, असे सुतोवाच केले आहे.
शेतीमध्ये साधने वाढविण्यासोबत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली 500 रुपयांची दर महिन्याची मदतही वाढेल. राज्य सरकारेही स्थानिक पातळीवर या मदतीमध्ये भर टाकू शकतात.
1 फेब्रुवारीला हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जेटलीच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 5 एकर खाली शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी दिवसाला 17 रुपये देऊन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्याची टीका केली होती.
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना विरोधी नेत्यांनी आता परिपक्व व्हायला हवे, कॉलेजची नाही तर देशाची निवडणूक लढणार आहात, असा टोला हाणला.