संधी दिली तर मुख्यमंत्रीही बनेन - राजदीप सरदेसाई
By admin | Published: May 25, 2016 02:13 AM2016-05-25T02:13:12+5:302016-05-25T02:13:12+5:30
गोमंतकीयांनी गोव्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली तर मी निश्चित मुख्यमंत्री बनेन; परंतु तशी संधी गोमंतकीय निश्चित देणार नाहीत याची मला खात्री आहे. तूर्तास मला पत्रकार म्हणूनच
पणजी : गोमंतकीयांनी गोव्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली तर मी निश्चित मुख्यमंत्री बनेन; परंतु तशी संधी गोमंतकीय निश्चित देणार नाहीत याची मला खात्री आहे. तूर्तास मला पत्रकार म्हणूनच राहायचे आहे, असे सांगत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत गोवन आॅफ द इयर पुरस्कार विजेते राजदीप सरदेसाई यांनी गोव्यात त्यांच्या राजकारण प्रवेशाविषयी चाललेल्या चर्चेला पूणर्विराम दिला. पुरस्कार वितरण सोहळ््यादरम्यान लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
सार्वजनिक पद भूषवायचे झाल्यास आपल्याला ते गोव्यात येऊनच भूषवायला आवडेल. परंतु पत्रकार हा राजकारणात प्रवेश करतो तेव्हा तो पत्रकार म्हणून थांबतो. आपल्याला पत्रकार म्हणून एवढ्यात थांबायचे नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.
पत्रकारिता तटस्थ असावी की एक भूमिका घेऊन पत्रकारांनी पुढे जावे याविषयी जी चर्चा होत आहे, त्याविषयी बोलताना पत्रकारांनी आपली तटस्थता कदापी सोडू नये असे सांगत पत्रकाराने न्यायाधीशाची भूमिका घ्यायची नसते असे मत त्यांनी नोंदवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले संबंध चांगले असले तरी अधूनमधून त्यात कटूत्वही पाझरल्याचे ते म्हणाले. तसे त्यांच्याशी आपले पूर्वीपासून चांगले संबंध होते. २००२च्या गुजरात दंगलीनंतर त्यात कटुता आली.
मोदी हे कर्मयोगी आहेत, ते नेहमी कामात व्यस्त असतात. आपण
त्यांना रिलॅक्स मूडमध्ये कधीच
पाहिले नाही. ते कौटुंबिक जीवनात गुंतून न राहिल्यामुळे कदाचित भावनाविवश होत नसावेत, असे सरदेसाई म्हणाले.
पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे अवलोकन करता कॉँग्रेसला भवितव्य आहे काय, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हा प्रश्न
प्रत्येक दहा वर्षांनी चर्चिला जात असल्याचे सांगितले. कॉँग्रेस संपणार नाही; परंतु पक्षापुढे समस्या मात्र निश्चित आहेत.
घराणेशाहीची सद्दी फार काळ चालणार नाही आणि राहुल गांधी यांनी राजकीय मत आपल्याला अनुकुल करून घेण्यासाठी फारशी मेहनत घेतलेली नाही. एकेकाळचे कॉँग्रेसवालेच वेगळा गट करून कॉँग्रेसला शह देत आहेत. तृणमूल कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस हे मूळ कॉँग्रेसचेच आहेत. प्रादेशिक पक्ष पर्याय देऊ लागले आहेत ही
वाईट गोष्ट नव्हे . लोकांच्या
समस्या घेऊन हे पक्ष जर पुढे येत आहेत तर ते निश्चितच चांगला
पर्याय ठरू शकतात. केवळ दिल्लीच्या राजकारणाची मक्तेदारी यापुढे चालणार नसल्याचे त्यांनी
सांगितले.
सरदेसाई यांच्या या उत्तरावर टिप्पणी करताना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी राजकारणात घराणेशाही असली तरीही प्रत्येकाला प्रत्येक पाच वर्षांतून आपली कार्यक्षमता ही सिद्ध करावीच लागते आणि त्यासाठी
जबाबदारी घेऊन काम हे करावेच लागते हे त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच स्वत: सरदेसाई यांना राजकारणात उतरण्याचे आवाहनही केले. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी तोलामोलाच्या साधनसुविधा विकसित करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)