सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

By admin | Published: February 22, 2016 03:43 AM2016-02-22T03:43:03+5:302016-02-22T03:43:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे.

If the government is unstable, I want to defame me | सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

Next

बारगढ (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. मात्र, अशा कारस्थानांना न जुमानता मी माझे काम करीत राहणार आहे, असे ते म्हणाले.
छत्तीसगढच्या दौऱ्यानंतर ओडिशात बारगढ येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, काही लोक आणखीही हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत की, एक चहावाला इसम देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळेच या इसमाला बाजूला करण्यासाठी हे लोक कारस्थान करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.


गरिबांसाठी पाच कोटी घरे
रायपूर : गरिबांसाठी २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथे रविवारी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची कोनशिला बसविताना केली. त्यांनी छत्तीसगडच्या डोंगरगड येथे देशभरातील ३०० गावांच्या विकासासाठी ‘रर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या गावांना विकास केंद्र मानून शहरांप्रमाणे नियोजन केले जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी माझे सरकार गरीब, दलित, आदिवासी आणि समाजातील अन्य दुर्बल घटकांसाठी कार्य करीत असल्याची ग्वाहीही दिली. सरकारने गरिबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत, रर्बन मिशन यासारख्या विविध योजना आणल्या आहेत.
या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वीरेंद्रसिंग उपस्थित होते.


पैशाचा तपशील मागताच एनजीओ दुखावले गेले
मोदी म्हणाले की, एनजीओ विदेशातून पैसा मिळवीत आहेत आणि सरकार त्याबाबतचा हिशेब मागत आहे. तथापि, जेव्हापासून आम्ही या पैशांचा तपशील मागणे सुरू केले आहे तेव्हापासून सगळे एकजूट झाले आहेत आणि म्हणत आहेत की, ‘मोदींना मारा, ते आम्हाला हिशेब मागत आहेत.’
देशाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की, जो पैसा आला तो खर्च कुठे झाला? अर्थात, हे कायद्यातच आहे.
सर्व एनजीओ आता एकत्र आले आहेत आणि कारस्थान करीत आहेत की, मोदींना कसे संपविता येईल? सरकारला कसे हटविता येईल? आणि मोदींना बदनाम कसे करता येईल? या देशातील आजारावरच्या उपचारासाठी जनतेने मला निवडले आहे. त्यामुळे थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणारही नाही.
मोदी म्हणाले की, मी जाणून आहे की, विरोधकांना नेमके काय खुपत आहे? मात्र, मी देशाला लुटण्याची आणि बरबाद करण्याची परवानगी देऊ शकत नाही.

कशी असेल रर्बन मिशन योजना
चार लगतच्या गावांचा नगरसमूह म्हणून विकास करताना अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. अशा ३०० ग्रामीण केंद्रांची उभारणी केली जाईल.
दरवर्षी १०० केंद्रांचा विकास केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. गावांचा अशा पद्धतीने विकास केल्यास आयुष्याच्या स्तरात खूप मोठा बदल घडून येईल.

 

Web Title: If the government is unstable, I want to defame me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.