महाआघाडी सत्तेत आली तर अराजक माजेल
By admin | Published: October 2, 2015 03:42 AM2015-10-02T03:42:09+5:302015-10-02T03:42:09+5:30
बिहारातील जनता दल(युनायटेड), राष्ट्रीय जनता दल(राजद) आणि काँग्रेस महाआघाडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी गुरुवारी जोरदार टीका केली.
पाटणा : बिहारातील जनता दल(युनायटेड), राष्ट्रीय जनता दल(राजद) आणि काँग्रेस महाआघाडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. तीन पायांवर धावणारी महाआघाडी कदापि निवडणूक जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. ही महाआघाडी सत्तेत आलीच तर राज्यात अराजक माजेल, असा इशाराही त्यांनी मतदारांना दिला.
येथील जाहीर सभेत जेटलींनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजपचे दृष्टिपत्र’ अर्थात ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जारी केले. भाजपप्रणीत रालोआ सत्तेत आल्यास बिहारचे मागासलेपण दूर होण्यास मदत होऊन राज्य प्रगती आणि विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, अशी ग्वाही देताना जेटलींनी भाजपशासित मध्य प्रदेशचे उदाहरण दिले. महाआघाडीच्या रूपात एक राजकीय विसंगती आपण बघतो आहोत. परस्परविरोधी आणि तीन पायांवर धावणारी ही महाआघाडी धावूच शकणार नाही. धावली तरीही शर्यतीत तिचा निभाव लागणारा नाही. संधीसाधू नेत्यांनी एकत्र येऊन तयार झालेली ही महाआघाडी सत्तेत आल्यास राज्यात केवळ आणि केवळ अराजक माजेल, असे जेटली यावेळी म्हणाले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ‘जंगलराज’च्या निर्मात्यांसोबत आघाडी केली असल्याचे सांगत त्यांनी लालूप्रसाद यांनाही लक्ष्य केले.
पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करीत, भाजपाचे हे दृष्टिपत्र राज्याच्या विकासासाठी असल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास, कृषी आधारित उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.