शाळांमध्ये हिजाब बंदी नाही तर सनातनी हिंदू मुलंही भगवा परिधान करून जातील - चक्रपाणी महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 03:21 PM2022-10-13T15:21:14+5:302022-10-13T16:05:20+5:30
Hijab Controversy: हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी हिजाब बंदीच्या मुद्द्यावरून मोठे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : हिजाबच्या मुद्द्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयात आजही अंतिम निकाल आलेला नाही. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्यात मदभेद असल्याने आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यायमूर्ती गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, तर न्यायमूर्ती धुलिया यांनी तो फेटाळला. या निर्णयानंतर देशात पुन्हा एकदा शाळांमधील हिजाब बंदीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली पाहिजे, असे स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे. तसेच, जर शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली नाही तर हिंदू सनातनी मुलेही भगवा परिधान करून, टिळक लावून शाळेत जातील, असेही स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे स्वामी चक्रपाणी महाराज हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत.
स्वामी चक्रपाणी महाराज यांनी कोरोना संसर्गाबाबतही वक्तव्य केले होते. कोरोना विषाणू हा प्राणी खाणाऱ्या मांसाहारींच्या पापाचा परिणाम आहे, असे स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले होते. याचबरोबर, मांस खाणाऱ्यांवर कडक कायदा करण्यात यावा. ते ISIS सारख्या दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत, जे प्राणी मारून खातात. भारतासारख्या देशात मांसाहारावर पूर्ण बंदी असायला हवी, असे कोरोना संसर्गावर स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले होते.
कोरोना लसीबाबतही स्वामी चक्रपाणी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दावा केला होता की, कोरोना लसीमध्ये गायीचे रक्त मिसळले आहे. त्यामुळे त्याचा वापर देशात होऊ देऊ नये. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या लसीमध्ये गायीच्या रक्ताचा वापर करण्यात आला आहे. जीव गेला तरी धर्म नष्ट होता कामा नये, असे स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले होते. दरम्यान, हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही अभिनेत्री कंगना राणौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.