हिंमत असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात टाकावे - स्मृती इराणी
By admin | Published: September 20, 2015 04:55 PM2015-09-20T16:55:37+5:302015-09-20T16:55:49+5:30
अमेठीतील जमीन घोटाळ्याच्या आरोपावर काँग्रेसला आक्षेप असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात पाठवावे असे आव्हानच स्मृती इराणींनी दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
अमेठी, दि. २० - अमेठीतील कारखान्यासाठी दिलेली जमीन राजीव गांधी ट्रस्टने बळकावल्याच्या आरोपावरुन मला काँग्रेसने मानहानीची नोटीस पाठवली असली तरी अशा प्रकारांना मी घाबरणार नाही, हिंमत असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात टाकावे असे आव्हानच केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत अमेठी मतरादसंघातून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवणा-या स्मृती इराणी यांनी अमेठीच्या मैदानातून पुन्हा एकदा काँँग्रेसला आव्हान दिले. काही दिवसांपूर्वी स्मृती इराणींनी अमेठीतील एका कारखान्यासाठी दिलेली जमीन राजीव गांधी ट्रस्टने स्वस्तात लाटल्याचा आरोप केला होता. यानंतर शनिवारी काँग्रेसने स्मृती इराणींना मानहानीची नोटीस पाठवली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी स्मृती इराणी यांनी अमेठीतील एका सभेत काँग्रेसवर टीका केली. 'मी केलेल्या आरोपांवर काँग्रेसला आक्षेप असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात पाठवावे' असे आव्हानच त्यांनी दिले. अशा नोटीसींना मी घाबरणार नाही, अशा १०० नोटीशी झेलायला मी तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.