भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 04:21 PM2019-10-03T16:21:36+5:302019-10-03T16:28:16+5:30
भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान फाळणीपासूनच तणावाचे संबंध आहेत. तर दोन्ही देशांदरम्यान चार वेळा युद्ध झाले आहे. सर्व युद्धांत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढत 370 कलम हटविल्याने भारतालाअणुयुद्धाची धमकी देण्यात येत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर युनोमध्ये याचा उच्चार केला होता. यावर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या युद्धाचे परिणाम काय होतील याचा अहवाल दिला आहे.
भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. भारत अण्वस्त्र सज्ज असला तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यासच अण्वस्त्रे वापरण्याची भुमिका वेळोवेळी घेत आला आहे. पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, परंतू भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाहता ती खूपच कमी आहेत. सैन्य दलाच्या बाबतीतही पाकिस्तान खूप मागे आहे. या पार्श्वभुमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा बंद झालेली आहे.
पाकिस्तानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. जर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर तब्बल 12.5 कोटी लोक मारले जातील. याचबरोबर जगालाही याचे चटके सोसावे लागतील. जगभरात उपासमारीची वेळ येईल. अमेरिकेच्या रटगर्स विद्यापीठाचे अभ्यासकर्ते एलन रोबक यांनी सांगितले की, जर आण्विक युद्ध झाले तर ते कोणत्या खास जागेवर होणार नाही, अणू बॉम्ब कुठेही पडू शकतात. या देशांदरम्यान 2025 मध्ये युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.
अणुहल्ल्य़ांमुळे 16 ते 36 हजार कोटी किलो कार्बन मिश्रित धुरळा उठणार आहे. हा धुरळा वायुमंडळाच्या वरच्या स्तरामध्ये पसरणार आहे. दोन्ही देशांकडे जवळपास 400 ते 500 अण्वस्त्रे असतील. या धुरळ्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. यामुळे तापमान 2 ते 5 अंशावर जाईल आणि पाऊसही 20 टक्क्यांनी कमी होईल. याचा अत्यंत वाईट परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.