'जयललिता अम्मा तर नरेंद्र मोदी देशाचे डॅडी', मंत्र्याकडून उदो उदो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:28 PM2019-03-09T16:28:03+5:302019-03-09T16:29:08+5:30
जेव्हा अम्मा जयललिता जिवंत होत्या, तेव्हा पक्षांची धुरा त्यांच्याकडे होती. त्यावेळी, त्यांचा निर्णय हा अंतिम होता.
चेन्नई - तामिळनाडूचेमंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी मोदींना वडिलांची उपमा दिली आहे. एआयएडीएमके पक्षाचे नेते आणि तामिळनाडू सरकारमधील दुग्ध विकासमंत्री यांना तुमचे वडिल कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बालाजी यांनी मोदी इज अवर डॅडी म्हणजे मोदी हेच आमचे पप्पा असल्याचं म्हटलं. तसेच मोदी हे आमच्या पक्षाचेही बाप असल्याचं ते म्हणाले.
एआयएडीएमके पक्षाच्या दिवंगत नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी भाजपासोबत एकत्र येण्याचं टाळलं होतं. मग, तरीही आपल्या पक्षाने भाजपासोबत युती का केली, असा प्रश्न बालाजी यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना जर जयललिता या अम्मा असू शकतात. तर नरेंद्र मोदी हे डॅडी. कारण, मोदींनी आम्हाला पाठिंबा दिला आणि अम्मांप्रमाणे मार्गदर्शनही करतात, असे बालाजी यांनी म्हटले आहे.
जेव्हा अम्मा जयललिता जिवंत होत्या, तेव्हा पक्षांची धुरा त्यांच्याकडे होती. त्यावेळी, त्यांचा निर्णय हा अंतिम होता. मात्र, आता अम्मांच्या नंतर मोदी हेच आमचे पिता आहेत, ते भारताचे पिता आहेत. म्हणून, आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य केलंय. गेल्याच आठवड्यात भाजपा आणि एआयएडीएमके यांची आघाडी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान, या तामिळनाडूतील या आघाडीनंतर केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी तामिळनाडूत भाजपा-एआयएडीएमके युती मिळून तामिळनाडूतील 40 जागांवर विजय मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. दरम्यान, एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने तामिळनाडूतील 20 जागांवर दावा केला असून इतर 20 जागा त्यांच्या आघाडीतील सीपीएम, सीपीआय, एमडीएमके, व्हीसीके, आययुएमएल, केएमडीके आणि आयजेके या पक्षांना वाटून देण्यात येणार आहे.