न्यायाधीशांनी बुरखा घालून फिरलं तर कळेल त्यांची प्रतिमा काय आहे - बार काउन्सिल
By admin | Published: June 18, 2015 04:15 PM2015-06-18T16:15:01+5:302015-06-18T18:12:09+5:30
जर न्यायाधीश बुरखा घालून कोर्टाच्या आवारात फिरले तर , वकिलांच्या मनात न्यायंत्रणेबाबत किती उद्विग्नता आहे, हे न्यायाधीशांना कळेल असे प्रतिपादन एका ज्येष्ठ वकिलाने केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - जर न्यायाधीश बुरखा घालून कोर्टाच्या आवारात फिरले तर , वकिलांच्या मनात न्यायंत्रणेबाबत किती उद्विग्नता आहे, हे न्यायाधीशांना कळेल असे प्रतिपादन एका ज्येष्ठ वकिलाने सुप्रीम कोर्टाला सांगितले. न्यायाधीश नेमण्याची सध्याची कॉलेजियम यंत्रणा बंद करून नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असावं असं आग्रही मत सुप्रीम कोर्ट बार असोसिशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी व्यक्त केलं आहे.
कॉलेजियम यंत्रणेमुळे पात्रता नसलेले न्यायाधीश नेमले जातात आणि सर्वसामान्य माणसाना मानवी अधिकारांपासून वंचित रहावं लागतं असं निरीक्षण दवे यांनी मांडलं आहे. सलमान खानचं नाव न घेता, जर टॉपचा फिल्म स्टार नसेल तर कारावासाची शिक्षा झालेल्या कुठल्या ड्रायव्हरला काही तासांमध्येच जामीन मिळतो असा सवालही दवे यांनी केला आहे. १९८४ ची शीखांविरोधातील दंगल असो वा २००२मधल्या गुजरातमधल्या दंगली असोत किती जणांना न्याय मिळालाय अशी विचारणाही दवे यांनी केली आहे.
राजकारणी असोत वा फिल्म स्टार्स न्यायालये आपली मर्यादा सोडतात व सर्वसामान्यांना मात्र साधा न्यायही मिऴत नाही असे सांगत, ही परिस्थिती सध्याच्या कॉलेजियम यंत्रणेमुळे आल्याचेही दवे यांनी म्हटले आहे.
अर्थात, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने यंत्रणा नाही तर काही न्यायाधीश चुकीचे वागले असल्याची शक्यता आहे असे म्हटले आणि काही न्यायाधीश तर आधी वकिलच होते असेही निदर्शनास आणले.
सध्याच्या यंत्रणेमध्ये सुधारण्याची व्यवस्था नसून, कोर्टाने मला माफ करावे परंतु, तुम्ही कुणाचे ऐकतही नाही अशी कैफियत दवे यांनी मांडली आहे. तुमच्याकडे अमर्याद सत्ता असून ती सत्ता तशीच वापरण्यात आल्याचं सांगताना दवे यांनी काही न्यायाधीशांनी या पदाची अप्रतिष्ठा केली असून न्यायाधीश म्हणजे एक विनोद वाटावा असं काम केल्याचं दवे यांनी निदर्शनास आणलं.
या सगळ्याचा विचार करता कॉलेजियम यंत्रणेच्या जागी नॅशनल ज्युडिशिअल अपॉइंटमेंट कमिशन स्थापन करण्यात यावा असं आग्रही मत दवे यांनी मांडलं आहे.