...तर १९६२च्या युद्धात मानहानी पत्करावी लागली नसती, अरुणाचलचे राज्यपाल मिश्रा यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:04 AM2021-11-22T08:04:06+5:302021-11-22T08:04:53+5:30
अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
इटानगर : चिनी सैन्याने अरुणाचलनजीक सीमारेषेवर संपूर्ण गाव वसवले असल्याने भारत आणि चीन संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना लष्कराने कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी केले आहे. तसेच देशाचे नेतृत्व सक्षम असते तर १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती, असेही मिश्रा म्हणाले.
अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, १९६२ मध्ये देशाचेते तत्कालीन नेतृत्व सक्षम असते तर चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती. आता मात्र चित्र पालटले आहे. भारतही शस्त्रसज्ज असून आव्हानाचा मुकाबला करू शकतो. मात्र, असे असले तरी आपण गाफील राहून चालणार नाही. सीमेवरील कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक सैनिकाने तत्पर राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांच्या नेतृत्वाखाली लष्करात अनेक बदल झाले असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.