Valentine Day ShivSena: व्हॅलेंटाईन डेला बाबू-शोना करताना दिसलात तर बडवणार, तिथेच लग्न लावणार; भोपाळ शिवसेनेचा प्रेमी युगुलांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 05:13 PM2022-02-13T17:13:16+5:302022-02-13T17:13:57+5:30
Shivsena on Valentine Day: शिवसैनिकांनी काठ्यांची पूजा केली आहे. उद्याने, बाग बगिच्यांमध्ये जर कोणी तसले उद्योग करताना दिसले तर त्यांच्या शरीराचा कोना कोना तोडण्याचा इशारा या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
जगभरातील करोडो जोडपी वाट पाहत असलेला व्हॅलेंटाईन डे एका दिवसावर आला आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनांनी या दिनाविरोधात इशारे देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी जर कोणी बाबू-सोना करताना दिसले तर त्यांना बडवून काढले जाईल असा इशारा शिवसेनेने या राज्यात दिला आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शिवसैनिकांनी काठ्यांची पूजा केली आहे. उद्याने, बाग बगिच्यांमध्ये जर कोणी तसले उद्योग करताना दिसले तर त्यांच्या शरीराचा कोना कोना तोडण्याचा इशारा या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
प्रेमी युगुलांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालिका शक्तीपीठ मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणांना इशारा दिला. याला पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक म्हणत शिवसेनेने विरोध करण्याची घोषणा केली आहे.
व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्या शिवसैनिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन शहराच्या विविध भागात पोहोचणार असल्याचे सांगितले. व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आढळल्यास तरुण-तरुणींचे जागीच लग्न लावून दिले जाईल, याचबरोबर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भोपाळमध्ये शिवसेनेने पब, रेस्टॉरंट, हॉटेलचालकांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असा इशारा दिला आहे. बजरंग दलासह देशात अशा अनेक संघटना आहेत ज्या देशात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास विरोध करतात. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रतील शिवसेना गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेबाबत मवाळ झाली आहे.