बंगालच्या पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 05:54 PM2019-04-29T17:54:25+5:302019-04-29T19:37:07+5:30
मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीरामपूर (पश्चिम बंगाल) - मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडांपासून तयार केलेला रसगुल्ला मिळासा, तर मी तो प्रसाद म्हणून स्वीकारेन असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज बंगालमधील श्रीरामपूर येथे झाली. त्यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी यांनी रसगुल्ल्यावरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ''मला दगड आणि मातीपासून बनवलेले रसगुल्ले देण्याची इच्छा ममता दीदींनी व्यक्त केली. ही बंगालची माती रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शामाप्रसाद मुखर्जी अशा महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्यामुळे अशा महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडांपासून तयार केलेला रसगुल्ला मिळासा, तर मी तो मी प्रसाद म्हणून स्वीकारेन,'' असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यामध्ये दगडांचा वापर करु. ही मिठाई मोदींना पाठवू, यामुळे मिठाई खाताना त्यांचे दात तुटतील, असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता.
बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मते हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करू. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.