मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

By admin | Published: April 6, 2015 04:25 AM2015-04-06T04:25:36+5:302015-04-06T04:25:36+5:30

नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही

If Marathi becomes 'career' then she will live ... | मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

Next

अविनाश थोरात, संत नामदेव नगरी (घुमान) -
नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही आक्रमण होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
घुमान येथे आयोजित ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे. जे. सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी साहित्यिक रेहमान राही, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला व ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी होते.
‘वाहे गुरू की खालसा, वाहे गुरू की फतेह’ असे म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. मराठी भाषेसमोरील आव्हानांचा त्यांनी ऊहापोह केला. ते म्हणाले, मराठी ही जगात पहिल्या १५ भाषांपैकी एक आहे. तरीही तिच्यावरील आक्रमणाची चर्चा होते. पहिलीपासून मराठी शिकविण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली जाते. मात्र, मराठीतून शिकण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी मराठीच्या उपासकांनी प्रयत्न करायला हवेत. संवेदना फक्त साहित्यच जिवंत ठेवू शकते. शेतकऱ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याची शक्ती साहित्यातून निर्माण व्हायला हवी.
देशाच्या विविधततेला जोडण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. मोरे यांनी, मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन केलेल्या कामगिरीचा इतिहास लिहिण्याचे काम सुरू करण्याची गरज प्रतिपादित  केली. पंढरपूर येथे
संत तुकारामपीठ स्थापन करावे तसेच मध्य प्रदेशातील ‘कालिदास’ पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही
संत नामदेव यांच्या नावाने महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकासाठी पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुस्तकांचे गाव
विनोद तावडे यांनी महाराष्ट्रामध्ये पुस्तकांचे एक गाव निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. या गावात चार ते पाच लाख पुस्तके असतील, तसेच साहित्यिक व रसिकांचा संवाद घडेल अशी कल्पना असल्याचे ते म्हणाले. साहित्यिकांना निधीसाठी मंत्रालयाच्या दारात येण्याची गरज भासणार नाही. विजयादशमीच्या दिवशीच साहित्य व नाट्य संमेलनासाठीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पुस्तकांची दुकाने कमी होत असल्याने प्रत्येक नगर परिषदेने पुस्तकांसाठी स्वस्त दरात गाळा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
महामंडळाचा हावरटपणा!
साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्यापासून पंजाब सरकारच्या औदार्याच्या अनेक कहाण्या महामंडळ आणि आयोजकांकडून सातत्याने सांगितल्या जात आहेत. महामंडळाने यात जणू हावरटपणा दाखवत थेट पंजाब सरकारकडे पंढरपूरमधील संत नामदेवांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधीची मागणी करण्याचा ठराव केला.
नामदेव समाजोन्नती परिषदेने सोडलेल्या या राष्ट्रीय स्मारकाच्या संकल्पासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित खर्चाच्या निधी संकलनासाठी केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांनी अर्थसाहाय्य करावे, अशी याचना या ठरावात करण्यात आली आहे.

Web Title: If Marathi becomes 'career' then she will live ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.