'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:39 AM2019-04-29T02:39:34+5:302019-04-29T02:39:56+5:30
दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही?
भोपाळ : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरलाही शाप दिला असता, तर भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती, असा टोला लगावत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.
भोपाळ येथील अशोका गार्डन्स येथे प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतासाठी प्राणाची आहुती देणारे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. मसूद अजहरलाही त्यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.
आम्ही पाताळातही शोधून दहशतवाद्यांना मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात; परंतु पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ते कुठे होते? हे दहशतवादी हल्ले का रोखता आले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.
काँग्रेसने भोपाळमधून माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर ‘मामा’ जाम घाबरले आहेत. प्रकृती ठीक नाही, असे सांगून गौर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली.
धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहा
हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन भाऊ-भाऊ आहेत. हे लोक असे म्हणतात की, हिंदू धोक्यात असल्याने हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. ५०० वर्षे मुस्लिमांची देशात सत्ता होती तेव्हा कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमच्या धर्मात ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतो; परंतु भाजप ‘ हर हर मोदी’ नारा देत आहेत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.