मोदींचा फायदा होणार असल्यास वाराणसीतून लढणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:21 AM2019-04-04T07:21:22+5:302019-04-04T07:21:57+5:30
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद; मायावती, अखिलेश भाजपचे एजंट
नवी दिल्ली : वाराणसीतील उमेदवारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदा होणार असेल तर ही लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही, असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी जाहीर केले आहे. अखिलेश यादव व मायावती हेच भाजपचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चंद्रशेखर आझाद हे भाजपचे एजंट असून वाराणसीमध्ये दलितांच्या मतांची विभागणी व्हावी यासाठीच ते तिथून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप बसपच्या प्रमुख मायावती यांनी नुकताच केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, दलितांवर अत्याचार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाच सपचे प्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बढती दिली होती. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे विधान माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संसदेत केले होते. यावरून सिद्ध होईल की मी नव्हे तर हे सारे लोकच भाजपचे एजंट आहेत.
चंद्रशेखर आझाद म्हणाले की, काही जण माझा उल्लेख एजंट म्हणून करतात. हो, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा एजंट आहे. जर माझेच लोक मार्गात आडवे आले नसते तर अखिलेश यादव यांना मी दाखवून दिले असते की, जर आम्ही तुम्हाला विजयी करू शकतो तर पराभवाची धूळही चारू शकतो. बसपतील सरचिटणीस व त्या पक्षातील ब्राह्मण नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी माझ्याबाबत मायावतींची दिशाभूल केली आहे.
‘मलाच पाठिंबा द्या’
वाराणसी लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला सप व बसपने पाठिंबा दिल्यास दलितांच्या मतांची विभागणी टळेल असेही ते म्हणाले. वाराणसीमध्ये मोदी यांच्या विरोधात सप-बसप-रालोद आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.