...तर मोदींच्या सूटला मिळाले असते ५ कोटी
By admin | Published: February 21, 2015 02:39 AM2015-02-21T02:39:23+5:302015-02-21T02:39:23+5:30
सूटला ४.३१ कोटी रुपये किंमत मिळाली असली तरी अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने ५ कोटी रुपयांची किंमत हुकली, अशी माहिती नवसारी (गुजरात)चे भाजपचे खा. सी. आर. पाटील यांनी दिली.
सी. आर. पाटील : लिलाव प्रक्रियेत मराठी माणसाचा महत्त्वपूर्ण सहभाग
सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित सूटच्या लिलावाची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली आणि सूटला ४.३१ कोटी रुपये किंमत मिळाली असली तरी अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने ५ कोटी रुपयांची किंमत हुकली, अशी माहिती नवसारी (गुजरात)चे भाजपचे खा. सी. आर. पाटील यांनी दिली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे व ही प्रक्रिया कशी चालली, याबाबत त्यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.
खा. चंद्रकांत रघुनाथ (सी. आर.) पाटील यांनी सांगितले की, सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एकूण तीन दिवस ही प्रक्रिया चालली. यामध्ये नागरिकांना आवाहन केल्याप्रमाणे राष्ट्रीय कार्यात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी प्रदर्शनात येऊन बोली लावावी, असे अपेक्षित होते. त्याप्रमाणे बोली लागत गेली. शुक्रवारी दुपारी ४.३० पर्यंत नागरिक कार्यालयात येत होते. बोली लावत होते. त्याबाबतचा अर्ज भरून देत होते. अखेर आज दुपारी ४.३० वाजता बोलीची प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यात सर्वांत जास्त बोली लावलेले धर्मानंद डायमंड कंपनीचे लालजी पटेल आणि त्यांचे पुत्र हितेश पटेल यांनी ४ कोटी ३१ लाख रुपयांना सूट खरेदी केला; परंतु लिलाव घेणे बंद झाल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांनी अवध ग्रुपने ५ कोटी रुपयांची बोली लावली होती. वेळ संपल्याने ती नाकारण्यात आली. अन्यथा या १० लाखांच्या सूटला तब्बल ५ कोटी रुपये मिळाले असते.
१० वर्षांपासून लिलाव
मोदींचा सूट, इतर भेटवस्तूंचा लिलाव करून निधी उभा करण्याची कल्पना पुढे कशी आली, असे विचारता पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कार्यासाठी नेहमीच निधी लागतो. तो उभा करण्यासाठी ही अभिनव कल्पना पुढे आली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्याही वेळी त्यांना येणाऱ्या भेटवस्तूंचा लिलाव केला जात असे. सलग १० वर्षे हा लिलाव होत आहे. मग आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही परंपरा खंडित होता कामा नये, असा विचार पुढे आला आणि लिलावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्याला प्रमाणाबाहेर यश मिळाले. (विशेष प्रतिनिधी)
कोण आहेत सी. आर. पाटील...
सी. आर. पाटील सध्या गुजरातमधील नवसारीचे खासदार असले तरी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पिंपरी अकाराऊत, एदलाबाद येथे झालेला आहे. १६ मे १९५५ रोजी जन्मलेले खा. पाटील यांचे सुरत येथे आयटीआय झालेले आहे व सध्या ते कृषीशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांना अस्खलित मराठी बोलता येते. भाजपचे कट्टर समर्थक असलेले पाटील १९८९ पासून पक्षकार्य करतात. त्यांनी विविध पदे पक्षात भूषवलेली आहेत. २०१४ची लोकसभा निवडणूक त्यांनी ५,५८,११६ मतांनी जिंकली.
लिलावातून मिळाले एकूण १० कोटी
या लिलावात मोदींच्या सूटबरोबरच इतरही अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनाही चांगली किंमत मिळाली. मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले असताना त्यांना पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली होती. त्या मंदिराला १ कोटी १८ लाख रुपये किंमत आली. लाकडावर कोरलेल्या गीतेला ५१ लाख रुपयांची किंमत आली. एका टी शर्टला ११ लाख रुपये किंमत आली. सूट आणि इतर वस्तू असे एकूण १० कोटी रुपये या लिलावातून गोळा करण्यात आले आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
सूटसाठी अशी लागत गेली चढाओढीने बोली...
1 या सूटच्या लिलावाचा शुक्रवारी तिसरा आणि शेवटचा दिवस होता. लिलाव संपण्यासाठी अवघे २० मिनिटे उरले असताना बोली २.९५ कोटींवर गेली.
2 मुकेश पटेल(बिल्डर) आणि संजय मोवलिया (हिरे व्यापारी) यांनी मिळून २.६५ कोटींची बोली लावली.
3 हितेश पटेल (धर्मानंदन डायमंडस्) यांनीही ३.६१ कोटींची बोली लावून चढाओढीत रंगत आणली. मुंबईतील हिरे व्यापारी विपुल शाह यांनी २.५१ कोटींची बोली लावून, मुकेश पटेल (सुरत) यांनी २.३१ कोटी रुपयांची, राजेश जैन (हरियाणा) यांनीही या चढाओढीत भाग घेत १.८५ कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखविली.
4 गुरुवारी सुरत येथील मुकेश पटेल यांनी १.३९ कोटींवरून १.४८ कोटी रुपयांची बोली लावली होती. दरम्यान, भावनगरचे कोमलकांत शर्मा यांनी १.४१ कोटी रुपयांत हा बहुचर्चित कोट खरेदी करण्याची तयारी दाखविली होती.
5 लिलावाच्या पहिल्या दिवशी राजेश जुनेजा आणि ग्लोबल मोदी फॅन क्लबचे राजेश माहेश्वरी यांनी अनुक्रमे १.२१ आणि १.२५ कोटींवर बोली नेली होती.