खासदाराने 2-3 लाख घेतले असतील तर काही फरक नाही पडत - ममता बॅनर्जी
By admin | Published: January 4, 2017 10:37 AM2017-01-04T10:37:07+5:302017-01-04T10:37:31+5:30
पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना अटक करण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप अनावर झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 4 - नोटाबंदी निर्णयावरुन आधीच केंद्र सरकारविरोधात रान पेटवणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप अनावर झाला जेव्हा पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे लोकसभा खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना कथित 17 हजार कोटींच्या रोज वेली चिटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. 2013 मध्ये हा घोटाळा समोर आला होता. सुदीप बंदोपाध्याय यांची अटकेसोबतच घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या तृणमूल खासदारांची संख्या दोनवर पोहोचली आहे. आठवड्याभरात तृणमूलच्या दुसऱ्या खासदाराला अटक करण्यात आली आहे.
कथित रोज वेली घोटाळ्याप्रकरणी बंदोपाध्याय यांच्यापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांनाही अटक करण्यात आली होती. तापस पाल सध्या भुवनेश्वरमध्ये सीबीआयच्या ताब्यात आहेत. बंदोपाध्याय मंगळवारी 11 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी सीबीआयने त्यांना तीन वेळा समन्स बजावला होता.
ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार जाणुनबुजून ही कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. 'वाद-विवादासाठी बोलायचं झालं तर सुदीप यांनी 2 -3 लाख रुपये घेतली असतील तर ही एवढी मोठी गोष्ट नाही. मला याची नक्की माहिती नाही. पण हाच वाद घालायचा असेल तर मोदींनाही अटक करायला हवी. करोडोंचा सूट घालण्यासाठी मोदींना कुठून पैसे मिळाले. भाजपा नेते परदेशातून निधी आणण्यासाठी अदानी ग्रुपची मदत घेतता. ते सगळ्या चोरांचे बाप आहेत,' अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात दहा राज्यांमध्ये निदर्शन करण्याची योजना आखली आहे. याची सुरुवात दिल्ली आणि कोलकातामधून करण्यात येणार आहे. नोटाबंदीवर आवाज उठवल्याने सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाचा माझ्याविरोधात वापर केला जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे.