मुलायमसिंहांना पंतप्रधान केल्यास युती
By admin | Published: December 5, 2015 09:10 AM2015-12-05T09:10:41+5:302015-12-05T09:10:41+5:30
पुढील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविल्यास काँग्रेससोबत युतीची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव
नवी दिल्ली : पुढील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविल्यास काँग्रेससोबत युतीची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मांडला आहे. त्यांनी सुचविलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे उपपंतप्रधान असतील.
शुक्रवारी येथे आयोजित एका नेतृत्व परिषदेतील परिसंवादादरम्यान अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेससोबत युतीसाठी आपला हा फॉर्म्युला मांडला. गांधी यांनी मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘मी समाजवादी असल्याने तुम्ही मला हे विचारत आहात. माझे वडील मला रागवतात असेही आपण म्हणता. नेताजींचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि मला त्यांच्यासाठी काम करता यावे, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. त्यांनी पंतप्रधान व्हावे आणि राहुल यांनी उपपंतप्रधान. हा प्रस्ताव स्वीकारार्ह असल्यास मी लगेच आघाडीसाठी तयार आहे’, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याच्या ४२ वर्षीय मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि संलग्न संघटनांकडून फूट पाडण्यासोबतच ज्या प्रकारची भाषा वापरली जाते ती बघता त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या संबंधांचा प्रश्नच उद्भवत नाही, हे ठासून सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)