'हिंदू' असल्याचे मान्य असेल तरच मुस्लिमांनी भारतात राहावे- सुब्रमण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 01:54 PM2018-02-07T13:54:19+5:302018-02-07T13:54:34+5:30
ओवेसी यांनी लोकसभेत मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली
नवी दिल्ली: मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर त्यांना आपले पूर्वज हिंदू असल्याचे मान्यच करावे, असे वक्तव्य भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तत्पूर्वी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवाऱ्यांना शिक्षा करण्याचा कायदा करावा, अशी मागणी केली. भारतात जे मुस्लिम आहेत त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन राष्ट्रांचा सिद्धांत नाकारला आहे. पण आजही भारतीय मुस्लिमांना बाहेरचे समजले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधल्यास तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असावी. पण केंद्रातील भाजपा सरकार असं कोणतंही विधेयक आणणार नाही, असे ओवेसी यांनी म्हटले होते.
राजकीय वर्तुळात ओवेसी यांच्या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटले. सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतात राहायचे असल्यास मुस्लिमांना काही अटी मान्य कराव्या लागतील, असे सांगितले. तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर तुमचे पूर्वज हिंदूच होते, ही बाब तुम्हाला निर्विवादपणे मान्य करावी लागेल. मुस्लिमांचा मूळ डीएनए हिंदूंचाच आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.
तर भाजपा खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले. मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांना भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवालही कटियार यांनी उपस्थित केला. मुस्लिमांना वेगळा भूभाग देण्यात आला असल्याने भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला जावे, असेही कटियार यांनी सांगितले.