मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:19 PM2024-06-03T16:19:31+5:302024-06-03T16:20:08+5:30
PM Narendra Modi : भाजपामध्ये मोठा उत्साह दिसत आहे. मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याचे जोरदार प्लॅनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तासच राहिले आहेत. गेल्या अडीज महिन्यांपासून सुरु असलेल्या लोकशाहीच्या यज्ञातून कोण-कोण तावून सुलाखून बाहेर पडते, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या बहुमताने तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडू लागल्या असून भाजपाकडून याच्या सेलिब्रेशनची तयारी सुरु करण्यात आली आहे.
भाजपामध्ये मोठा उत्साह दिसत आहे. मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याचे जोरदार प्लॅनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा शपथग्रहण सोहळा या आठवड्यातील विकेंडला होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन ठिकाणांची चाचपणी भाजपाकडून करण्यात येत आहे. या सोहळ्याला जगभरातून सुमारे १० हजार लोक उपस्थित राहण्याची तयारी केली जात आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हा सोहळा भारत मंडपम किंवा कर्तव्य पथवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी साऊंड आणि लाईट शो देखील असण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु हा सोहळा 9 जून रोजी होऊ शकतो, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
2019 मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यानंतर 30 मे रोजी सरकारचा शपथविधी पार पडला होता. शपथविधी सोहळ्याचा राजकीय कार्यक्रम तसेच मोठा मेळावा आयोजित करण्यावरून चर्चा झाल्याचेही भाजपा नेत्याने सांगितले आहे. उष्णतेच्या लाटेला पर्याय म्हणून रामलीला मैदान, लाल किल्ला ते भारत मंडपम आणि यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर अशी अनेक ठिकाणे निवडण्यात आली आहेत, असेही या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
भारत मंडपममध्ये जी20 शिखर सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती सचिवालयाने 28 मे रोजीच राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी सजावटीच्या इनडोअर आणि शोभेच्या वस्तूंसाठी निविदा जारी केल्या आहेत. या निविदा आज उघडल्या जाणार असून कंत्राटदाराला तयारीसाठी पाच दिवस मिळणार आहेत.