'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास राम मंदिराच्या गेटसमोर आत्महत्या करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 04:40 PM2019-04-30T16:40:28+5:302019-04-30T16:41:24+5:30
वसीम रिजवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायले असून 2019 मध्ये मोदीच देशाचे पंतप्रधान होतील,
लखनौ - लोकसभा निवडणुकांचे मतदान अंतिम टप्प्यात येत असताना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाची सत्ता येणार आणि कोण पंतप्रधान होणार यावर पैजा लागत आहेत. तर, अनेकजण आप-आपले भाकित सांगताना अक्षरश: जीवाची बाजी लावताना दिसून येत आहे. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनीही असेच विधान केले आहे.
वसीम रिजवी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींचे गोडवे गायले असून 2019 मध्ये मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकित केले आहे. विशेष म्हणजे मोदी पंतप्रधान न झाल्यास अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळच मी आत्महत्या करेन, असे वसीम रिजवी यांनी म्हटले आहे. कुठल्याही धर्मापेक्षा राष्ट्रच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत रिजवी यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.
मी जेव्हा देश आणि देशहितासंदर्भात बोलतो, त्यावेळी कट्टरपंथीयांकडून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. देशातून मोदी सरकार गेल्यास, आम्ही तुझे तुकडे-तुकडे करू, अशी धमकी मला मिळत असल्याचेही रिजवी यांनी म्हटले आहे. देशप्रेमी लोकांमध्ये मोदींप्रती प्रेम, तर गद्दारांमध्ये भीती आहे. नरेंद्र मोदी हेच कुशल पंतप्रधान आहेत. त्यामुळे जर 2019 मध्ये इतर कुठल्याही पक्षाचा नेता पंतप्रधान झाला, तर मी अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळ जाऊन आत्महत्या करेल. कारण, देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा सन्मानपूर्वक जीवन संपवेल, असे रिजवी यांनी म्हटले आहे.
कोण आहेत रिजवी
वसीम रिवजी हे शिया वक्फ बोर्डचे प्रमुख आहेत. राम मंदिरसंदर्भातील वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. बाबरी मशिद ही शिया वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, अयोध्येत राम मंदिर व्हावे आणि मशिदीसाठी इतरत्र जागा निर्माण केली पाहिजे, असेही मत ते परखडपणे मांडतात. त्यामुळे मुस्लीम समाजातील अनेक संघटनांचा त्यांना विरोध आहे.
दरम्यान भोपाळमध्येही निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. दरम्यान, पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.