NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:36 PM2024-05-30T13:36:01+5:302024-05-30T13:37:43+5:30
4 जूनला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. 1 जूनला अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. 4 जूनला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल. यातच, एनडीएने राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत एनडीए पुन्हा विजयी झाल्यास, कर्तव्यपथावर शपथविधीच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. म्हत्वाचे म्हणजे, कर्तव्यपथावर कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, निवडणूक निकाल NDAच्या बाजूने आल्यास, 9 जूनला शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यावेळी राष्ट्रपती भवनाच्या मैदाना ऐवजी कर्तव्य पथावर या समारंभाचे आयोजन करण्याची NDA ची इच्छा आहे.‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक निकाल आल्यानंतर, कर्तव्य पथावरील शपथविधीच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यात येईल. यासंदर्भात 24 मेरोजी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विंगमध्ये एक बैठकही झाली. या बैठकीला ऑल इंडिय रेडिओ आणि दूरदर्शनचे अधिकारीही उपस्थित होते. यात शपथविधी समारंभाच्या कव्हरेज संदर्भात चर्चा झाली.
कर्तव्य पथच का? -
आता प्रश्न असा निर्माण होतो की, शपथविधी सारख्या एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या समारंभासाठी कर्तव्य पथच (आधीचे राजपथ) पहली पसंती का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी NDA अशा जागेच्या शोधात आहे, ज्या ठिकाणी अधिकाधिक लोक या समारंभाचे साक्षिदार होऊ शकतील. तसेच देश आणि जगाला विकसित भारताचे दर्शनही होऊ शकेल.
महत्वाचे म्हणजे, कर्तव्य पथ हा महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा सेंटरपीस आहे. या प्रोजेक्टचे बांधकामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे, त्यामुळे येथे शपथविधी सोहळा आयोजित केल्यास विकसित भारताची झलक लोकांना पाहता येणार आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे, कर्तव्य पथावर अधिकाधिक लोक एकत्र येऊ शकतील.