Video: गरज भासल्यास हातात शस्त्रं घेऊन संरक्षण करु; EVM संशयाचं रण पेटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 05:36 PM2019-05-21T17:36:57+5:302019-05-21T17:37:39+5:30
एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे.
पटणा - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीने राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. बिहारच्या आघाडीमधील आरएलएसपीचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी जर ईव्हीएममध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही हातात शस्त्र घेऊ, मतांच्या रक्षणासाठी बलिदान देऊ असं विधान केल्याने खळबळ माजली आहे.
यावेळी बोलताना उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, ईव्हीएमबाबत छेडछाड करण्याचे प्रकार होत आहेत. जनतेमध्ये आक्रोश आहे. लोकांनी केलेलं मतदान लुटण्याचे काम केले जात आहे. जर जनतेची मते लुटली जात असतील गरज पडल्यास हाती शस्त्रे घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तसेच वेळ पडली तर बिहारच्या जनतेनेही हातात हत्यार घेऊन संरक्षणासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.
बिहार लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. नितीश कुमार यांच्यासाथीने भाजपा बिहारमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एनडीएला बिहारमध्ये किमान 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Upendra Kushwaha, RLSP in Patna: Vote ki raksha ke liye zaroorat pade toh hathiyaar bhi uthana ho toh uthaiye. Aaj jo result loot ki jo ghatna karne ki jo koshish ho rahi hai toh isko rokne ke liye hathiyaar bhi uthana ho toh uthana chahiye. #LokSabhaElections2019pic.twitter.com/g29bsWGyre
— ANI (@ANI) May 21, 2019
ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी अशाप्रकारे वातावरण निर्मिती केली जात आहे. स्ट्राँगरुममधून ईव्हीएम खाजगी वाहनांमध्ये घालून कुठे नेतायेत? काय गडबड सुरु आहे असं राबडी देवी यांनी संशय व्यक्त केला.
बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे.