आरोपीच नाही तर मग समन्स का पाठवले? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ईडीला चोख प्रतुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:32 PM2024-01-18T14:32:57+5:302024-01-18T14:34:29+5:30
आज केजरीवाल यांनी ईडीकडून चौथ्यांदा चौकशीसाठी बोलवले होते
Arvind Kejriwal vs ED: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ते ईडीसमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी त्यांचे उत्तर केंद्रीय एजन्सीला पाठवले आहे. आम आदमी पार्टीने (आप) ही माहिती दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीला उत्तर दिल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. केजरीवाल हे आरोपी नसतील तर समन्स का बजावले? असा सवाल केजरीवालांनी तपास यंत्रणेला केला असल्याचे सांगितले जात आहे.
'आप'ने भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केजरीवाल यांना अटक करणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणे हा त्यांचा विचार आहे. ईडीने लिहिले आहे की, केजरीवाल आरोपी नाहीत, मग समन्स आणि अटक कशासाठी? त्याचबरोबर ते म्हणाले की, भ्रष्ट नेते भाजपमध्ये गेल्यावर त्यांची प्रकरणे बंद केली जातात. आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, आमचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही, असा आरोप आपने केला आहे.
ईडीसमोर हजर न झाल्याने उत्तरे देण्याची वेळ
ईडीने चौथ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवले होते. यापूर्वी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 3 जानेवारीला त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते एकदाही एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी मागील नोटीस बेकायदेशीर असल्याचे देखील म्हटले होते आणि राज्यसभा निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख केला होता. पहिल्या समन्सला उत्तर देताना, केजरीवाल म्हणाले होते की ते पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, तर दुसऱ्या समन्सच्या वेळी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांना पूर्व-नियोजित विपश्यनेसाठी जावे लागेल.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आप, केजरीवाल, सिसोदिया आणि सिंग यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे प्रकरण "राजकीय सूड" असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यास त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही, याबाबत सर्वसामान्यांकडून प्रतिक्रिया मागवण्याची मोहीमही पक्षाने सुरू केली आहे.