दहशतवाद संपविण्याची इच्छा असेल, तर पाकला सैन्य पुरवू - राजनाथ सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:43 AM2019-10-14T04:43:41+5:302019-10-14T04:43:55+5:30
राफेल असती तर बालाकोटची गरजच नव्हती, पाकिस्तानने आपले वागणे अजूनही सुधारावे
कर्नाल/चंदीगड : पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद समाप्त करण्याची पाकिस्तानची जर खरेच इच्छा असेल तर भारत त्यांना सैन्यपुरवठा करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकला सुनावले. पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी तुकडे व्हायला नको असतील तर त्यांनी आपले वागणे अजूनही सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत पतौडी येथील प्रचारसभेत राजनाथसिंह म्हणाले: आज मला अत्यंत नम्रपणे पाकिस्तानला अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी आपली विचारसरणी बदलावी. अन्यथा पाकिस्तानचे एकदा दोन तुकडे झालेच आहेत. आता त्याची अनेक शकले उडतील.
ते असेही म्हणाले की, पाकिस्तानने प्रामाणिकपणे वागावे, दहशतवादाचे उच्चाटन करावे आणि बंधुभाव ठेवावा, असे मला त्यांना सांगावेसे वाटते. आपण शेजारी देश आहोत व आपल्याला एकत्रितच वाटचाल करायची आहे. तुम्ही स्वत:हून प्रामाणिकपणे दहशतवादाशी मुकाबला केला नाहीत, तर भारत स्वत:च्या जोरावर या शक्तिंचा बिमोड करण्यास भारत समर्थ आहे, हे पाकिस्तानने पक्के समजून घ्यावे.
कर्नाल येथील आणखी एका सभेत ते म्हणाले की, भारताकडे आधीपासूनच राफेल लढाऊ विमाने असती तर बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद््ध्वस्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसावेही लागले नसते. (राफेल विमानांनी) इथून भारतातूनच आपल्याला ते काम फत्ते करता आले असते, असेही राजनाथसिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)
त्यांनी निष्कारण वाद घातला...
फ्रान्समध्ये पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर तेथे केलेल्या शस्त्रपूजेवरून झालेल्या वादाविषयी ते म्हणाले की, मी त्या लढाऊ विमानावर ‘ओम’ असे लिहून त्यास ‘रक्षा बंधन’ (लिंबू-मिरची) बांधले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी वाद सुरू केला. आता आपल्याला राफेल मिळताहेत याचे स्वागत करण्याऐवजी त्यांनी निष्कारण वाद घातला. त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानलाच अधिक बळ मिळते.