पाऊस चांगला झाला तर स्वस्त कर्जाची बरसात - RBI
By admin | Published: April 15, 2016 12:51 PM2016-04-15T12:51:32+5:302016-04-15T12:51:32+5:30
यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करता येईल परिणामी गृहकर्जे, वाहन कर्जे आणखी स्वस्तात उपलब्ध होतील असे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करता येईल परिणामी गृहकर्जे, वाहन कर्जे आणखी स्वस्तात उपलब्ध होतील असे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. "आम्ही महागाईच्या दरावर लक्ष ठेवून आहोत, जर पाऊस चांगला पडला तर व्याजदर कपात शक्य होईल," असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी वॉशिंग्टनमध्ये बोलताना सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करून 6.5 टक्के केले. हा दर गेल्या पाच वर्षातला नीचांकी दर आहे. जानेवारी 2015 पासून बँकांना देण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदर दीड टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी व्याजदरात आणखी कपात व्हावी अशी उद्योगांची मागणी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठकीसाठी राजन, तसेच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली अमेरिकेत आहेत. यावेळी त्यांनी चांगला पाऊस पडला तर आणखी व्याजदर कपात करण्यास वाव मिळेल असे स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून तसे झाल्यास स्वस्त कर्जाचीही बरसात होईल असे संकेत राजन यांनी दिले आहेत.