सन्मान दिला जात नसेल तर शपथविधीला का जायचे - शिवसेना
By admin | Published: October 30, 2014 05:04 PM2014-10-30T17:04:22+5:302014-10-30T17:25:06+5:30
शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाणार नसेल तर कशाला जायचे त्या शपथविधी सोहळ्याला अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मांडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाणार नसेल तर कशाला जायचे त्या शपथविधी सोहळ्याला अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मांडली आहे. आज रात्रीपर्यंत आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले तर शपथविधी सोहळ्याला जायचा विचार करु असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाने महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. उद्या वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे व अन्य शिवसेना नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या सोहळ्याल अनुपस्थित राहण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, जिथे आमचा अवमान केला जातोय त्यांच्या शपथविधी सोहळ्याला का जायचे अशी भावना शिवसेना आमदारांनी व्यक्त केली आहे. आज रात्रीपर्यंत आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले तरच आम्ही सोहळ्याला उपस्थित राहू असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसते.
विधानसभेत पाठिंबा देण्याबाबत भाजपा आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. मात्र मंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये तणातणी सुरु आहे. उद्या शिवसेनेचा कोणताही नेता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही असे भाजपा नेते राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तणावात भर पडली आहे. आज रात्री पाठिंब्यासंदर्भात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये होणारी बैठकही रद्द झाली आहे. मनसेध्यक्ष राज ठाकरेही या सोहळ्याला जाणार नाहीत असे समजते.