तर सचिन, रेखाने राज्यसभेचा राजीनामा द्यायला हवा - नरेश अग्रवाल

By admin | Published: March 30, 2017 06:41 PM2017-03-30T18:41:00+5:302017-03-30T19:56:05+5:30

समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत बोलताना सचिन तेंडुलकर आणि रेखा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

If Sachin Tendulkar wants to resign from Rajya Sabha - Naresh Agrawal | तर सचिन, रेखाने राज्यसभेचा राजीनामा द्यायला हवा - नरेश अग्रवाल

तर सचिन, रेखाने राज्यसभेचा राजीनामा द्यायला हवा - नरेश अग्रवाल

Next

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनियुक्त केलेल्या अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे दोन्ही सदस्य सभागृहात सतत गैरहजर असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून एकदाही संसदेत त्यांना पाहिलेले नाही. सभागृहाच्या कामकाजातही ते सहभागी होत नाहीत. संसदीय कामकाजात रेखा आणि सचिन तेंडुलकरांना खरोखर रस नसेल तर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा ते राजीनामा का देत नाहीत? असा सवाल समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी हरकतीचा मुद्दा (पॉर्इंट आॅफ आॅर्डर) माध्यमातून राज्यसभेत उपस्थित केला. उपसभापती कुरियन यांनी मात्र हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही, असे उत्तर देत अग्रवाल यांचा आक्षेप फेटाळला मात्र या दोन्ही सदस्यांनी किमान काही दिवस तरी सभागृहात यावे, कामकाजात सहभागी व्हावे, यासाठी त्यांचे मन वळवले पाहिजे, असे आग्रही आवाहन सभागृहाला केले. नरेश अग्रवाल त्यावर म्हणाले, सभागृहात व्यक्त झालेल्या भावनांबाबत उपसभापतींच्या सुचनेनुसार मी दोघांना पत्र पाठवीन. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, अर्थकारण, अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचे संसदेत प्रतिनिधित्व असावे, यासाठी या क्षेत्रातल्या १२ नामवंतांना राष्ट्रपतींतर्फे ६ वर्षांसाठी राज्यसभेवर नामनियुक्त केले जाते. युपीएच्या कारकिर्दीत अखेरच्या टप्प्यात अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर या दोघांची नियुक्ती झाली होती. याखेरीज नामनियुक्त सदस्यांमधे अनु आगा, संभाजीराजे छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रूपा गांगुली, नरेंद्र जाधव, एम.सी.मेरीकॉम, के.पारासरन, गोपी सुरेश, सुब्रमण्यम स्वामी, केटीएस. तुलसी यांचा समावेश आहे. राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री रेखा गणेशन आजतागायत फक्त दोनदा काही वेळासाठी सभागृहात आल्या. सभागृहात एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही, कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. सार्वजनिक वितरण व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या त्या सदस्या आहेत. या समितीच्या बैठकीलाही त्या उपस्थित नव्हत्या. लोकोपयोगी कार्यासाठी आपल्या खासदार निधीचा त्यांनी वापर केल्याचीही कुठे नोंद दिसत नाही. अभिनेत्री रेखा यांच्या तुलनेत क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांचे संसदेतले रेकॉर्ड मात्र काहीसे बरे म्हणता येईल. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातले दोंजा व आंध्रप्रदेशातील पुत्तमराजु कांदरीगा ही २ गावे तेंडुलकरांनी दत्तक घेतली. या गावात नवी शाळा, पाणीपुरवठा योजना, काँक्रीट रस्ता, गटार योजना इत्यादीसाठी आपल्या खासदार निधीतून आजवर ४ कोटी रूपयांपेक्षाही अधिक निधी तेंडुलकरांनी पुरवला आहे. २0१५ च्या हिवाळी अधिवेशनात विविध मंत्रालयांशी संबंधित २ आणि २0१६ च्या हिवाळी अधिवेशनात १0 अतारांकित प्रश्नांची नोंद तेंडुलकरांच्या नावावर आहे. याखेरीज योगा व क्रीडा हे विषय शालेय शिक्षणात अनिवार्य करावेत, या मुद्यावर सरकारचे आश्वासन मिळवण्यात तेंडुलकर यशस्वी ठरले आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीचे ते सदस्य आहेत.

Web Title: If Sachin Tendulkar wants to resign from Rajya Sabha - Naresh Agrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.