काळवीट प्रकरणात सलमानला तुरुंगवास मिळाल्यानं 'या' चित्रपटांवर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 01:48 PM2018-04-05T13:48:38+5:302018-04-05T13:49:07+5:30
1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला असून, पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजस्थान- 1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला असून, पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सलमान खानला शिक्षा झाल्यानं त्याच्या चित्रपटांना मोठा फटका बसणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या बिष्णोई समाजातील नागरिकांनी सलमान खान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.
सलमान खान सध्या रेस 3ची शूटिंग करत आहे. रेमो डिसुजाच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार होतोय. परंतु या चित्रपटाचं चित्रीकरण अद्यापही अपूर्णच आहे. या चित्रपटाचा बजेट 100 कोटींच्या घरात आहे. सलमान या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. परंतु जर सलमान खानला शिक्षा झाली तर हा चित्रपटही प्रभावित होणार आहेत. तसेच सलमानचे आगामी चित्रपट भारत, दबंग 3 सुद्धा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकाल सलमानच्या विरोधात गेल्यानं ऑक्टोबरमध्ये सुरू होणा-या बिग बॉस 12मध्येही सलमानला भाग घेता येणार नाही. सलमान खान एका शोसाठी 11 कोटी रुपये मानधन घेतो.
20 वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. 1- 2 ऑक्टोबर 1998च्या मध्यरात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळविटांचा एक कळप दिसताच सलमानने गोळ्या झाडून त्यापैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. मात्र, अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून, या प्रकरणातील आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे, असा दावा सलमानच्या वकिलांनी कोर्टात केला होता. या प्रकरणात किमान 1 वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.