शरद पवार उभे राहिले तर ठीक, नाहीतर...; राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरून विरोधकांचे ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:21 PM2022-06-15T18:21:00+5:302022-06-15T18:44:33+5:30
बैठकीला जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पवारांचेच नाव पुढे करण्यावर सारे सहमत झाले.
राष्ट्रपती निवडणुकीवरून विरोधकांमध्ये खल सुरु आहे. आज विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष होते. या बैठकीला जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पवारांचेच नाव पुढे करण्यावर सारे सहमत झाले. पवारांनी यासाठी नकार दिला आहे. यामुळे अन्य उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली.
या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, जर शरद पवारांनी स्वत: आपल्या नावावर शिक्कामोर्तब केले तर चांगले होईल, अन्यथा आम्ही संयुक्त उमेदवाराच्या नावावर विचार करू.
Opposition leaders adopt a resolution to field a common candidate in the forthcoming Presidential election pic.twitter.com/XgCUFMzEIW
— ANI (@ANI) June 15, 2022
विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहण्यावर आग्रह करण्यात आला. मात्र, पवारांनी तेव्हाच यास नकार दिला. यानंतर ममता यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. परंतू, उमर अब्दुल्ला यांनी त्यास विरोध केला. सुत्रांनुसार ममता यांनी दोन नेत्यांची नावे सुचविली. यामध्ये गोपाळ कृष्ण गांधी आणि दुसरे नाव अब्दुल्ला यांचे होते. याशिवाय एन के प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.
Several parties were here today. We've decided we will choose only one consensus candidate. Everybody will give this candidate our support. We will consult with others. This is a good beginning. We sat together after several months, and we will do it again: Mamata Banerjee, TMC pic.twitter.com/oI2L5xDp3n
— ANI (@ANI) June 15, 2022
बैठकीला अनेक पक्ष आले होते. आम्ही सर्वानुमते उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष या उमेदवाराला आपले समर्थन देतील. यावर आम्ही चर्चाही करू. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र आलो होतो, पुन्हा एकत्र येऊन चर्चा करू, असे ममता म्हणाल्या.
मेहबुबा मुफ्ती आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच संयुक्त बैठकीला आले होते. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना, द्रमुकचे नेते आले होते. आठवडाभरात दुसरी बैठक घेण्याचे ठरले आहे. या बैठकीत संयुक्त उमेदवाराचे नाव निवडले जाऊ शकते. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी पवार, ममता आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर देण्यात आली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.