फटाक्यांवरील बंदी अमलात आणल्यास दिवाळीत दिल्लीकरांना मिळणार ८ वर्षांतील सर्वोत्तम हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:22 AM2023-11-13T10:22:51+5:302023-11-13T10:22:59+5:30
पाऊस आणि वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली
नवी दिल्ली : फटाक्यांवरील कडक निर्बंध अमलात आणले गेले, तर दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता गेल्या आठ वर्षांतील सर्वोत्तम राहू शकते. दिल्लीकरांची रविवारची सकाळ निरभ्र आकाश व सूर्यप्रकाशासह झाली. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी सात वाजता २०२ होता. जो गेल्या तीन आठवड्यांतील सर्वोत्तम आहे. शून्य ते ५० दरम्यानचा एक्यूआय ‘चांगला’ असतो. ५१ ते १०० दरम्यानचा ‘समाधानकारक’, १०१ ते २०० ‘मध्यम’आहे, २०१ ते ३०० ‘खराब’, ३०१ ते ४०० ‘अत्यंत खराब’, ४०१ ते ४५० दरम्यानचा एक्यूआय ‘गंभीर’ व ४५० वरील एक्यूआयची ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत गणना होते.
काल शनिवारी (दि. ११) दिवाळीच्या पूर्वसंध्येला २४ तासांचा सरासरी एक्यूआय २२० होता. जो आठ वर्षांतील सर्वोत्तम होता. यावेळी दिल्लीत दिवाळीपूर्वी हवेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा झाली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शुक्रवारी अधूनमधून पडणारा पाऊस आणि प्रदूषकांना वाहून नेण्यासाठी अनुकूल वाऱ्याचा वेग. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीतील एक्यूआय ३१२, २०२१ मध्ये ३८२, २०२० मध्ये ४१४, २०१९ मध्ये ३३७, २०१८ मध्ये २८१, २०१७ मध्ये ३१९ आणि २०१६ मध्ये ४३१ होता. (वृत्तसंस्था)
पावसाने मिळाला दिलासा
२८ ऑक्टोबरपासून पुढील दोन आठवडे शहरातील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ ते ‘गंभीर’ अशी होती. या काळात राजधानीला धूळमिश्रीत धुक्याने गुदमरून टाकले होते. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हलक्या पावसासह अनुकूल हवामानामुळे दिवाळीपूर्वी हवेच्या गुणवत्तेत किरकोळ सुधारणा होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब आणि हरयाणासह वायव्य भारतातील बहुतांश भागात पाऊस पडला. त्यामुळे शेतकचरा जाळण्याने पसरणाऱ्या धुराचे प्रमाण कमी होऊन दिल्लीकरांना थोडा दिलासा मिळाला.