‘आताच PM पदाचा उमेदवार घोषित केल्यास I.N.D.I.A. आघाडीत फूट पडेल’, सपा नेत्याचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:56 AM2023-08-31T11:56:38+5:302023-08-31T11:57:39+5:30
I.N.D.I.A. Alliance: बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच या आघाडीचे संयोजकपद आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार यावरून इंडिया आघाडीतल घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शफिकूर रहमान बर्क यांनी पंतप्रधानपदावरून मोठं विधान केलं आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह अनेक भाजपाविरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज आणि उद्या मुंबईत होत आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे संयोजक, जागावाटप आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच या आघाडीचे संयोजकपद आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार यावरून इंडिया आघाडीतल घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शफिकूर रहमान बर्क यांनी पंतप्रधानपदावरून मोठं विधान केलं आहे.
शफीकुर रहमान बर्क यांनी सांगितले की, आताच पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यास इंडिया आघाडीमध्ये फूट पडू शकते. पंतप्रधानपदाचा चेहरा आताच घोषित केला जाऊ शकत नाही. हा प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाही तर संपूर्ण विरोधी पक्षांचा आहे. विरोधी पक्ष एकत्र होऊन जो निर्णय घेतील तो योग्य असेल आणि सर्वमान्यही असेल. त्यामुळे वेळेआधी कुठल्याही एका चेहऱ्याला समोर आणल्यास विरोधी पक्षांमध्ये फूट पडेल, असा दावाही त्यांनी केला.
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना बर्क पुढे म्हणाले की, भाजपाकडे दाखवण्यासाठी कुठलंही चांगलं काम नाही आहे. त्यांच्या पक्षाचे लोक देशातील परिस्थिती बिघडवण्याचं आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संपूर्ण विरोधी पक्ष त्रस्त आहे, असेही त्यांनी सांगितलं.