हिंमत असेल तर मोदींनी सर्वांसमक्ष चर्चा करावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:50 AM2019-04-02T07:50:28+5:302019-04-02T07:50:31+5:30
ममतांचे आव्हान; भाजपला बहुमत अशक्यच
विशाखापट्टणम : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत विरोधकांशी खुलेआम चर्चा करावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा व बहुमत मिळणार नाही, असेही भाकीत त्यांनी वर्तविले.
तेलुगू देसम पार्टीने येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, २०१४च्या निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १७ जागा कर्नाटकातील होत्या. आगामी लोकसभा निवडणुकांत एवढ्याही जागा भाजपला जिंकता येणे अशक्य आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला आहे. गुजरातमध्येही या पक्षाला लोकसभेच्या पूर्वीसारखा विजय मिळणार नाही. उत्तर प्रदेशात २०१४ साली भाजपविरोधी मतांत विभागणी झाल्याने त्या पक्षाला ८० पैकी ७३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला त्या राज्यात १५ हून जास्त जागा मिळणे अवघड आहे. एनडीए सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामगिरीवर मोदींची खुलेआम चर्चा करण्याची तयारी असल्यास विरोधकांकडून आम्ही एक प्रतिनिधी पाठवू. तो कोणत्याही कागदपत्रांचा आधार न घेता
मोदींना प्रश्न विचारेल. मोदींनीही कोणती कागदपत्रे न चाळता
किंवा टेलिप्रॉम्पटरची मदत न घेता उत्तरे द्यावीत, अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. (वृत्तसंस्था)
‘सैन्याचा अवमान’
भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथांनी संरक्षण दलांचा अवमान केला आहे अशी खरमरीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्य भाजपच्या मालकीचे नसून ते साऱ्या देशाचे आहे. देशाच्या संरक्षण दलांबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने योगी आदित्यनाथ यांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे.