स्पेसक्राफ्टमध्ये आग लागल्यास कसे वाचणार गगनयानमधील अंतराळवीर? इस्रोने बनवला जबरदस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:28 PM2023-10-20T17:28:20+5:302023-10-20T17:28:57+5:30
Gaganyaan : भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेचं २०२५ मध्ये प्रक्षेपण होणार आहे. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असणार आहे. त्याआधी २१ ऑक्टोबर रोजी टेस्ट फ्लाईटचं प्रक्षेपण करणार आहे.
भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेचं २०२५ मध्ये प्रक्षेपण होणार आहे. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असणार आहे. त्याआधी २१ ऑक्टोबर रोजी टेस्ट फ्लाईटचं प्रक्षेपण करणार आहे. टेस्ट फ्लाईटदरम्यान कुठल्याही प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी इस्रोकडून हरसंभव प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक उपकरणाची अनेकदा चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, गगनयान मोहिमेतील अंतराळवीर स्पेसक्राफ्टमधून अंतराळात जात असताना काही दुर्घटना घडून आग लागली तर काय होऊ शकतं, अशा परिस्थितीत अंतराळवीरांना वाचवण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार करण्यात आला आहे. त्यानुसार तशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या अपोलो मोहिमेशी संबंधित तीन अंतराळवीर अशाच मोहिमेदरम्यान, जळून मृत्युमुखी पडले होते. त्या मोहिमेतील व्यवस्थाही फुलप्रूफ होती. मात्र तांत्रिक त्रुटीमुळे रॉकेट एएस-२०४ च्या कमांड सर्व्हिस मॉड्युलमध्ये आग लागली आणि त्यात ह्या तिघांचा मृत्यू झाला होता. या तिघांची नावं गस ग्रिसम, ए़ड व्हाइट आणि रॉजर शेफ अशी होती. हे तिघेही लाईफ सपोर्ट सिस्टिमने सुसज्ज होते. मोहिमेवर जाण्यासाठी रॉकेटमध्ये स्वारही झाले होते. मात्र एकाएकी कॅप्सुल फुटली आणि केवळ २५.५ सेकंदांमध्ये तापमान १ हजार डिग्रीपर्यंत गेले. या दुर्घटनेमुळे अपोलो मोहिमेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर नासाने सुरक्षेसाठी आणखी उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली.
अपोलो मोहिमेच्या त्या अपयशामधून इस्रोने धडा घेतलेला आहे. तसेच त्यामधून गगनयान मोहिमेमध्ये सुरक्षेवर अधिकाधिक लक्ष दिले आहे. इस्रो क्रू एस्केप सिस्टिमबाबत विचार करत आहे. त्यामाध्यमातून आणिबाणीच्या स्थितीत अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर कसं आणता येईल, याची आखणी केली जात आहे. इस्रोच्या टेस्ट फ्लाइटला टीव्ही-डी १ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामधील टीव्हीचा अर्थ टेस्ट व्हेईकल असा आहे. गगनयान मोहिमेंतर्गत २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्याचं प्रक्षेपण केलं जाईल. त्यामध्ये क्रू मॉड्युल आणि क्रू एस्केप सिस्टिमसुद्धा इन्स्टॉल करण्यात आली आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे जर मोहीम कुठल्याही पातळीवर स्थगित करावी लागली तर अंतराळवीरांचं कशा प्रकारे संरक्षण करता येईल, याची चाचपणी करण्यात येणार आहे. टीव्ही-डी१ ला १.२ मॅक स्पीडसोबत सुमारे ११.७ किमी उंचीवर पाठवले जाईल.