तिसरं महायुद्ध झाल्यास तीन गटात विभागलं जाईल जग, भारत असेल कुठल्या गटात? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:43 AM2023-02-24T10:43:05+5:302023-02-24T10:43:55+5:30
world war 3: तिसरे महायुद्ध सुरू झाल्यास जग तीन गटांमध्ये विभागलं जाईल, त्यात एकीकडे अमेरिका आणि रशिया आमने-सामने असतील. तर दुसरीकडे एक नवा गट समोर येईल.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. हल्लीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनचा दौरा केला होता. हा दौरा हे या युद्धाला लागलेले नवे वळण म्हणून पाहिले जात आहे. आता एकतर युद्ध थांबेल किंवा अधिक भयावह होईल. कदाचित त्यातून तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तिसरे महायुद्ध सुरू झाल्यास जग तीन गटांमध्ये विभागलं जाईल, त्यात एकीकडे अमेरिका आणि रशिया आमने-सामने असतील. तर दुसरीकडे एक नवा गट समोर येईल.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये लवकरच शस्त्रसंधी झाली नाही तर दोन्ही देशातील युद्धाची ही आग संपूर्ण जगभरात पसरेल. तसेच इच्छा असो वा नसो अनेक देश हे महायुद्धाच्या खाईत लोटले जातील. त्यातील काही देश हे रशियाची साथ देतील. तर काही देश हे अमेरिकेच्या बाजूने उभे राहतील. मात्र या युद्धात एक तिसरा गटही असेल. त्यात असे काही देश सहभागी असतील, ज्यांचा दोन्ही गटातील देशांशी काही ना काही संबंध असेल, मात्र त्यांना युद्ध नको असेल, तसेच अनिच्छेने त्यांच्यावर युद्ध लादले गेले असेल. संरक्षण तज्ज्ञ आणि अमेरिकेच्या फेडरल इंटेलिजन्स सर्व्हिसचे माजी उपाध्यक्ष रुडॉल्फ जीएम यांनी जीआयएसचा डेटा पाहून अशा प्रकारचा दावा केला आहे.
यातील पहिल्या गटात पाश्चिमात्य उदारमतवादी आणि भांडवलशाही देश एका बाजूला असतील. यामध्ये अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंग्डम, जपान, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशांचा समावेश असेल. दक्षिण कोरियाही याच गटात जाईल कारण त्यांना अमेरिकेने वेळोवेळी मदत केलेली आहे.
दुसऱ्या गटामध्ये रशिया असेल. या बाजूला बेलारूस, इराण, सिरिया, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरिया हे देश असतील. चीन ऑन एंड ऑफ पद्धतीने असेल. मात्र तो याच गटात राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण अमेरिकेऐवजी स्वत:ला सुपरपॉवर म्हणून समोर आणण्याचा चीनचा प्रयत्न हे असेल. तसेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या म्हणीप्रमाणे चीन मुत्सद्देगिरीच्या चाली खेळू शकतो.
तर तिसरा जो गट असेल त्यामध्ये विकसनशिल देशांचा समावेश असेल. विकसित देशांसाठी आव्हान म्हणून पुढे आलेला भारत या गटाचं नेतृत्व करू शकतो. भारतासोबत इतर आशियाई देश असतील. दक्षिण अमेरिका आणि अरब देश हेसुद्धा या गटात असू शकतात. युद्ध थांबवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.