भुंकूनही काही होत नसेल, तर न्यायव्यवस्था अन् माध्यमांनी चावा घ्यावा: न्या. कुरियन जोसेफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:04 AM2018-04-10T11:04:04+5:302018-04-10T11:04:04+5:30
राखणदाराच्या भूमिकेतील न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांनी धोका असल्यास त्यांच्या मालकाला (लोकशाहीला) भुंकून जागे केले पाहिजे.
नवी दिल्ली: लोकशाही व्यवस्थेत न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे हे राखणदाराच्या (वॉचडॉग) भूमिकेत असतात. या दोघांनीही समाजातील प्रत्येक घटनेवर बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे आणि लोकशाही धोक्यात असेल तर भुंकून सर्वांना जागे केले पाहिजे, असे मत न्या. जोसेफ कुरियन यांनी मांडले.
नवी दिल्लीत केरळ मीडिया प्रबोधिनीतर्फे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील आणि केंद्र सरकार यांच्यातील वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राखणदाराच्या भूमिकेतील न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांनी धोका असल्यास त्यांच्या मालकाला (लोकशाहीला) भुंकून जागे केले पाहिजे. मात्र, भुंकूनही लोकशाही व्यवस्थेतील घटकांना जाग आलीच नाही तर ते धोकादायक असते. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांनी व्यवस्थेचा चावा घ्यायलाही मागेपुढे पाहू नये. अपवादात्मक परिस्थितीत भुंकणारे कुत्रे चावत नाहीत, हा समज मोडीत काढला पाहिजे, असे परखड मत न्यायमूर्ती जोसेफ यांनी व्यक्त केले.
काही महिन्यांपूर्वी न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. यामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात न्या. चेलमेश्वर यांनी आपण निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. न्या. जोसेफ कुरियन यांनीही कालच्या कार्यक्रमात हाच सूर आळवला.