राम मंदिराला विरोध असेल, तर पाकमध्ये जा; शिया मुस्लीम नेत्याच्या उद्गारावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:36 PM2018-02-03T23:36:31+5:302018-02-03T23:36:48+5:30
अयोध्येत राम मंदिर उभारण्यास ज्यांचा विरोध आहे, त्यांनी पाकिस्तानात वा बांग्लादेशात निघून जावे, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी केले आहे.
फैजाबाद (उत्तर प्रदेश) : अयोध्येत राम मंदिर उभारण्यास ज्यांचा विरोध आहे, त्यांनी पाकिस्तानात वा बांग्लादेशात निघून जावे, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील शिया मुस्लिमांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यास याआधीच परवानगी दिली आहे. त्यांनी त्या जागेवरील आपला अधिकार सोडताना, संबंधित वादग्रस्त जागा शिया समुदायाची होती, त्यामुळे सुन्नी मुस्लिमांनी त्याबाबत काही बोलू नये, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिया समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाºया रिझवी यांनी केलेल्या वक्तव्याला सुन्नी मुस्लीम फारसे महत्त्व द्यायला तयार नाहीत.
बाबरी मशीद-राम मंदिर वादाची सुनावणी ६ फेब्रुवारीपासून कोर्टात सुरू होत आहे. त्याच्या तीन दिवस आधी मुस्लीम नेत्याने असे विधान करणे महत्त्वाचे मानले जात आहे. रिझवी शुक्रवारी राम जन्मभूमी न्यासाचे आचार्य सत्येंद्र दास यांच्या भेटीनंतर बोलत होते. ज्यांचा अयोध्येत राम मंदिर बांधण्यास विरोध आहे, ज्यांना त्या ठिकाणी पुन्हा मशीद बांधायची आहे वा जे लोक तशा पद्धतीने विचार करीत आहेत, त्यांनी खुशाल पाकिस्तान वा बांग्लादेशात जावे. त्यांना भारतात अजिबात स्थान नाही, असे रिझवी म्हणाले. मशिदीच्या नावावर जे जिहादची भाषा करीत आहेत, त्यांनी अबु बक्र अल बगदादीच्या इसिस संघटनेत सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
रिझवीना अटक करा
रिझवी यांच्या विधानाला शिया समाजाच्या धर्मगुरूंनी विरोध केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाºया रिझवींना अटकेची मागणी धर्मगुरूंनी केली आहे. शिया उलेमा कौन्सिलचे मौलाना इफ्तकार हुसैनी इन्कलाबी म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रिझवी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्ता बळकावून विकण्याचा प्रयत्न केला होता.